केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी गुरुवारी संध्याकाळी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये सार्वजनिक क्षेत्रातील बँकांसाठी ३० हजार ६०० कोटींची घोषणा केली. त्याचे सकारात्मक पडसाद मुंबई शेअर बाजारामध्ये दिसून आले असून सेन्सेक्सनं नव्या विक्रमाच्या दिशेने झेप घेतली आहे. आज मुंबई शेअर बाजार उघडला, तेव्हा सेन्सेक्सनं तब्बल ३५६.९५ अंकांनी उसळी घेत आत्तापर्यंतचा उच्चांक गाठला. एकीकडे सेन्सेक्सनं ५९ हजार ४९८.११ अंकांपर्यंत झेप घेतलेली असताना निफ्टीनं देखील १७,७३२.७० अंकांची विक्रमी नोंद केली आहे. शेअर बाजाराच्या या उसळीमध्ये बँकिंग क्षेत्रातील शेअर्सने केलेल्या चांगल्या कामगिरीचा मोठा वाटा दिसून आला.

 

आजच्या कामगिरीमध्ये ब्लू-चिप एनएसई निफ्टी५०नं ०.५२ टक्के वाढ नोंदवत १७ हजार ७२१ इतक्या विक्रमी उच्चांकाची नोंद केली. याआधी निफ्टीची सर्वोत्तम कामगिरी १७,७४१.०५ इतकी होती. बजाज फायनान्स, टायटन आणि आयटीसी यांच्या शेअर्सने आज सकाळी बाजार उघडल्यानंतर जोरदार उसळी घेतल्याचं दिसून आलं.

अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांची महत्त्वपूर्ण घोषणा!

यंदाच्या अर्थसंकल्पातून प्रस्तावित करण्यात आलेल्या ‘नॅशनल अ‍ॅसेट रिकन्स्ट्रक्शन कंपनी लिमिटेड (एनएआरसीएल)’च्या स्थापनेसाठी ३०,६०० कोटी रुपयांच्या सरकारी हमीच्या तरतुदीची घोषणा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी गुरुवारी केली. यातून देशातील बँकांकडे तुंबत गेलेल्या बुडीत कर्ज मालमत्ता ताब्यात घेणाऱ्या ‘बॅड बँके’ची वाट खुली होणार आहे. पुढील पाच वर्षांत वसुली पूर्ण थकलेल्या बँकांच्या एकूण दोन लाख कोटी रुपयांच्या कर्ज मालमत्ता ‘बॅड बँके’मार्फत ताब्यात घेतल्या जाऊन बँकांवरील भार हलका केला जाईल, असा विश्वास अर्थमंत्र्यांनी व्यक्त केला. नवस्थापित ‘एनआरसीएल’ला दिली गेलेली सार्वभौम हमी ही पाच वर्षे कालावधीसाठी असून, या कंपनीला त्या बदल्यात शुल्क भरावे लागेल, असे सीतारामन यांनी स्पष्ट केले. बँकांकडून त्यांच्या अनुत्पादित व बुडीत मालमत्ता संपादित करताना, त्या बदल्यात ‘एनआरसीएल’ला रोख मोबदला आणि रोख्यांमार्फत सरकारची हमी द्यावी लागणार आहे. या रोख्यांच्या मूल्यात घसरण झाल्यास, त्याची भरपाई करण्यासाठी ‘एनआरसीएल’ला ही सार्वभौम हमी दिली गेली आहे. त्याचा परिणाम आजच्या शेअर मार्केटमधल्या उसळीमध्ये दिसून आला.