केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी शुक्रवारी देशाचा अर्थसंकल्प सादर केला. त्यानंतर शेअर बाजारात घसरण पहायला मिळाली होती. सोमवारी मुंबई शेअर बाजारात पुन्हा एकदा मोठी घसरण पहायला मिळाली. शेअर बाजाराचा निर्देशांक (सेन्सेक्स) 665 अंकांनी घसरून 38,848.54 वर आला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निर्देशांकातही 205 अंकांची घसरण पहायला मिळाली. शेअर बाजाराच्या 30 पैकी 25 तर राष्ट्रीय शेअर बाजाराच्या 50 पैकी 44 शेअर्समध्ये घसरण दिसून आली. अर्थसंकल्पाचा परिणाम शेअर बाजारावर झाला असल्याचे मत काही जाणकारांकडून व्यक्त करण्यात आले.

दरम्यान, पीएनबी बँकेत भूषण पाव अँड स्टील या कंपनीचा 3 हजार 800 कोटी रूपयांचा घोटाळा समोर आला आहे. पीएनबीने याची माहिती रिझर्व्ह बँकेलाही दिली आहे. हा घोटाळा समोर आल्यामुळे पीएनबीच्या शेअर्समध्येही 10 टक्क्यांपर्यंत घसरण दिसून आली आहे. तर दुसरीकडे ओएनजीसी, हीरो मोटोकॉर्प, एल अँड टी, मारूती आणि एसबीआयच्या शेअर्समध्ये घसरण झाल्याचे पहायला मिळत आहे.

तेल कंपन्यांच्या शेअर्समध्येही मोठ्या प्रमाणात घसरण झाल्याचे दिसून येत आहे. हिंदुस्तान पेट्रोलियम, भारत पेट्रोलियम या कंपन्यांच्या शेअर्समध्ये घसरण झाल्याचे पहायला मिळाले. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या वाढत्या किंमतीचा परिणाम झाल्याचे मत तज्ज्ञांकडून व्यक्त करण्यात येत आहे.