भांडवली बाजार मुंबई शेअर बाजार आणि (बीएसई) युनायटेड स्टॉक एक्स्चेन्ज (यूएसई) या चलन व्यवहार व्यासपीठाचे एकत्रीकरण होण्याचा मार्ग अखेर खुला झाला आहे. समभाग व चलन व्यवहार एकाच व्यासपीठावर होण्याबाबतच्या प्रस्तावाला उभय कंपन्यांच्या भागधारकांनी मान्यता दिली आहे. यूएसईमध्ये बीएसईचा १४.५६ टक्के हिस्सा आहे.
विलीनीकरणाला सर्वप्रथम मे २०१४ मध्ये सहमती झाली होती. असे विलीनीकरण करण्याचा प्रस्ताव यापूर्वी दोन्ही कंपन्यांनी मुंबई उच्च न्यायालयात एका याचिकेद्वारे ठेवला होता. त्याचबरोबर भारतीय स्पर्धा आयोग व सेबीनेही या योजनेला अनुक्रमे जुलै व ऑगस्ट २०१४ मध्ये मंजुरी दिली होती. युनायटेड स्टॉक एक्स्चेंजला सेबीने मार्च २०१० मध्ये चलन व्यवहाराचा परवाना दिला होता. या क्षेत्रातील देशातील हा चौथा बाजारमंच होता. या व्यासपीठावर कंपनी डॉलर-रुपया, युरो-रुपया, पौंड-रुपया, येन-रुपया असे चलन व्यवहार होत. देशातील २६ सार्वजनिक व अनेक खासगी बँका या व्यासपीठाचा उपयोग करत.
लघु, मध्यम उद्योगांच्या निधी उभारणीसाठी बीएसई-येस बँक एकत्र
आशियातील सर्वात जुना भांडवली बाजार असलेल्या मुंबई शेअर बाजाराने खासगी क्षेत्रातील येस बँकेबरोबर करार केला असून याअंतर्गत भांडवली बाजाराच्या व्यासपीठावर लघु व मध्यम उद्योगांना निधी उभारणीचा प्रसार व प्रोत्साहन उपलब्ध करून दिले जाणार आहे. लघु व मध्यम उद्योगांना भांडवली बाजाराच्या माध्यमातून किरकोळ गुंतवणूकदार तसेच बँक व वित्तसंस्था, व्यापार सहयोगी तसेच धोरणकर्त्यांद्वारे निधी उभारणीबाबतचे मार्गदर्शन मिळेल. या वेळी झालेल्या कराराप्रसंगी येस बँकेचे सल्लागार अजय कुमार, वरिष्ठ उपाध्यक्ष संजय अगरवाल, वरिष्ठ समूह अध्यक्ष प्रलय मंडल तसेच मुंबई शेअर बाजाराचे मुख्य व्यवसाय अधिकारी व्ही. बालसुब्रमण्यम, बीएसई एसएमईचे प्रमुख अजय ठाकूर आदी उपस्थित होते. मुंबई शेअर बाजारात सध्या लघु व मध्यम उद्योगासाठी स्वतंत्र व्यवहार व्यासपीठ उपलब्ध आहे.
ऑगस्ट २०१० मध्ये मुंबई शेअर बाजार इमारतीत यूनायटेड स्टॉक एक्स्चेन्जद्वारे सुरू करण्यात आलेल्या चलन व्यवहारप्रंसगी तत्कालिन मुख्य कार्यकारी अधिकारी मधू कन्नन, व्यवस्थापकीय संचालक टी. एस. नारायणस्वामी व यूएसईचे संचालक गौरव अरोरा.