कर्मचाऱ्यांचे वेतन वेळेत देण्यात अपयश आल्याने टीकेला सामोरे जावे लागलेल्या ‘भारत संचार निगम लिमिटेड’ अर्थात ‘बीएसएनएल’ला सरलेल्या वित्त वर्षांत १४,२०२ कोटी रुपयांचा तोटा झाला आहे.

सरकारी मालकीची दूरसंचार सेवा ‘बीएसएनएल’ने २०१८-१९ मध्ये १४,२०२ कोटी रुपयांचे नुकसान सोसले आहे. कंपनीला वित्त वर्षांत १९,३०८ कोटी रुपयांपर्यंतच्या महसुलातील घसरणीलाही सामोरे जावे लागले असल्याची माहिती बुधवारी संसदेत देण्यात आली.

कंपनीला २०१५-१६ मध्ये झालेल्या ४,८५९ कोटी रुपयांचे नुकसान वर्षांगणिक विस्तारत १४,२०२ कोटी रुपयांपर्यंत पोहोचल्याची माहिती केंद्रीय दूरसंचारमंत्री रविशंकर प्रसाद यांनी लोकसभेत एका लेखी प्रश्नाच्या उत्तरात दिली. मोबाइल व्यवसायातील स्पर्धा तसेच कमी दर त्याचबरोबर रिलायन्स जिओच्या स्पर्धेत ४जी आघाडीवरील पिछाडी आणि कर्मचाऱ्यांवर होणारा मोठा खर्च आदी कारणे सरकारी दूरसंचार कंपनीने स्पर्धात्मकता गमावण्याला तसेच तिच्या वाढत्या तोटय़ासाठी सरकारकडून देण्यात आली आहेत.

‘बीएसएनएल’चा महसूलही २०१६-१७ मधील ३१,५३३ कोटी रुपयांवरून सातत्याने कमी होत असल्याचे प्रसाद यांनी सांगितले. गेल्या वित्त वर्षांत कंपनीतील कर्मचाऱ्यांच्या वेतनापोटी एकूण महसुलाच्या प्रमाणात ७५ टक्के खर्च झाल्याचेही केंद्रीय दूरसंचारमंत्र्यांनी सांगितले.