करोना संकट आणि शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सोमवारी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी देशाचा अर्थसंकल्प सादर केला. विकासाला गती देण्यासाठी सरकार आपली तिजोरी अधिक खुली करत असल्याचे या अर्थसंकल्पामधून दिसून येत आहे. आरोग्य आणि पायाभूत सुविधांच्या क्षेत्रांमध्ये मोठी भांडवली गुंतवणूक करत रोजगार वाढवणे व त्याद्वारे लोकांच्या हातात पैसा उपलब्ध करून देण्याचा केंद्राचा प्रयत्न असल्याचा दावा अर्थमंत्र्यांनी केला. या अर्थसंकल्पासंदर्भात अनेकांनी मतप्रदर्शन केलं आहे. भाजपाच्या अनेक नेत्यांनी हा अर्थसंकल्प उत्तम असल्याचे म्हटले आहे तर विरोधकांनी मात्र यावर टीका केली असं असतानाच उद्योजकांनीही या अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत. अदानी उद्योग समुहाचे गौतम अदानी यांनाही ट्विटरवरुन मोदी सरकारच्या अर्थसंकल्पाचे तोंड भरुन कौतुक केलं आहे.

नक्की पाहा >> मोदी सरकारच्या काळात अदानींच्या २१ कंपन्यांना मंजूरी; जाणून घ्या Adani Agri Logistics आहे तरी काय?

अर्थसंकल्प सादर करताना निर्मला सीतारामन यांनी अनेक म्हणी, रविंद्रनाथ टागोर यांच्या वचनांचा संदर्भ आपल्या भाषणात दिला. तर दुसरीकडे शेतकऱ्यांचा मुद्दा, खासगीकरण यासारख्या मुद्द्यांवरुन विरोधकांनी अर्थसंकल्प मांडत असतानाच गोंधळ केला. सीतारामन यांनी अर्थसंकल्प सादर करताना काही बंदराचा खासगीकरणाच्या माध्यमातून विकास केला जाणार आहे अशी घोषणा केली. त्यानंतर विरोधकांनी संसदेमध्येच अदानी अदानी असा आरडाओरड करत गोंधळ केल्याचे चित्र पहायला मिळालं होतं. शेतकरी कायदेही काही ठरावी उद्योजकांच्या फायद्याचे असल्याचा आरोप विरोधकांकडून केला जातोय. यामध्ये खास करुन अदानी आणि अंबानी उद्योग समुहांचे नाव विरोधकांकडून वारंवार घेतलं जात आहे. याच अदानी समुहाचे सर्वेसर्वा असणाऱ्या गौतम अदानी यांनी बजेटवर आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

गौतम अदानी यांनी आपल्या अधिकृत ट्विटर हॅण्डलवरुन असा अर्थसंकल्प शतकातून एकदाच तयार होतो असं म्हटलं आहे. शतकातून एकदाच असा अर्थसंकल्प सादर होतो. या अर्थसंकल्पातून आत्मनिर्भर भारतावरील विश्वास दिसून येत आहे. आपलं राष्ट्रीय हित लक्षात घेऊन अल्पकालीन उपाययोजना, आर्थिक विवेकबुद्धी आणि दीर्घकालीन दृष्टीने घेतलेले धाडसी निर्णय या अर्थसंकल्पामध्ये दिसून येत आहेत, असं अदानी यांनी ट्विटरच्या माध्यमातून म्हटलं आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही या अर्थसंकल्पासंदर्भात मत व्यक्त करताना, कृषी क्षेत्र आणि शेतकऱ्यांच्या मिळकतीमध्ये वाढ होईल यावर अर्थसंकल्पात भर देण्यात आला आहे तर कृषी उत्पन्न बाजार समित्या अधिक सक्षम करण्यासाठी तरतूद करण्यात आली असं सांगितलं. तर काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी अर्थसंकल्पावरुन मोदी सरकारवर निशाणा साधला. सार्वजनिक क्षेत्रातील दोन बँका आणि एक विमा कंपनी यांच्यासह सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्या आणि वित्तीय संस्थांच्या भागभांडवलाची विक्री करून सरकारने भारताची मालमत्ता भांडवलदार मित्रांच्या हाती सुपूर्द करण्याची योजना आखली आहे, असा टोला राहुल यांनी लगावला आहे.