बहुराज्यीय विस्तार असलेल्या कपोल सहकारी बँकेसाठी २०१३-१४ हे वर्ष स्थापनेचे हीरक महोत्सवी वर्ष असून, या वर्षांत नवीन विस्तार नियोजनासह, विविध नवीन व खास वित्त उत्पादने व योजनांचा आपल्या ग्राहकांना बँक लाभ देऊ इच्छित आहे.
हीरक महोत्सवी वर्षांसाठी नियोजन म्हणून बँकेने टीव्हीवरील लोकप्रिय मालिका ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’मध्ये जेठालालची भूमिका बजावणारे दिलीप जोशी यांची बँकेने ब्रॅण्ड अम्बॅसेडर म्हणून नियुक्तीही घोषित केली आहे. कपोल बँकेचे उपाध्यक्ष के. डी. व्होरा यांनी त्यांचे स्वागत केले. सध्या कपोल बँकेच्या महाराष्ट्रात १४ शाखा तर एक शाखा सूरत (गुजरात)मध्ये कार्यरत आहे. सर्व शाखा संपूर्ण संगणकीकृत असल्याचे कपोल बँकेचे अध्यक्ष प्रकाश आर. मेहता यांनी सांगितले.
२०११-१२ वर्षांत बँकेच्या ठेवींमध्ये तब्बल ६१४.६३ कोटींची भर पडून त्या रु. १०३९.५४ कोटींवर गेल्या, तर २०१२-१३ वर्षांअखेर ठेवींचा आकडा रु. ११२५ कोटींचा स्तर गाठणे अपेक्षित आहे. हीरक महोत्सवी वर्षांसाठी बँकेने आखलेल्या व्यवसाय विस्ताराचे महत्त्वाकांक्षी नियोजन पाहता ठेवींमध्ये आणखी लक्षणीय वाढ दिसून येईल, असे मेहता यांनी स्पष्ट केले.