19 November 2017

News Flash

मोठे होण्यासाठी जोखीम पत्करून काळानुरूप बदलणे आवश्यक – शंतनू भडकमकर

जमिनीच्या वाढत्या किमती, विजेचे वाढते दर या घटकांमुळेही उद्योगवाढीला मर्यादा येतात

प्रतिनिधी, मुंबई | Updated: September 13, 2017 2:38 AM

शंतनू भडकमकर

छोटे ते मोठे उद्योग : वाढीचे संक्रमण

उद्योग व्यवसायात दीर्घकाळ टिकून राहण्यासाठी काळानुरूप बदलत राहणे अपरिहार्य ठरते. प्रगतीसाठी काही प्रमाणात जोखीमही पत्करावी लागते. एखादा प्रयोग फसू शकतो. मात्र त्यामुळे निराश न होता उद्योजकांनी सतत पुढे जात राहणे आवश्यक असते. त्यातूनच संधी मिळत जाऊन छोटय़ा उद्योगांचे मोठय़ा व्यवसायात रूपांतर होते, असे प्रतिपादन महाराष्ट्र चेंबर्स ऑफ कॉमर्सचे माजी अध्यक्ष शंतनू भडकमकर यांनी ‘छोटे ते मोठे उद्योग-वाढीचे संक्रमण’ या विषयावरील सत्रात बोलताना केले.

ठरावीक अंतराने सातत्याने होणारी वाढ उद्योग उत्तम असल्याचे लक्षण आहे. देशाची अर्थव्यवस्था, सरकारी धोरणं, विशिष्ट प्रदेशातील व्यावसायिक वातावरण, उद्योजकाची क्षमता, तंत्रज्ञान आदी अनेक घटक वाढीवर परिणाम करणारे ठरतात. पुन्हा प्रत्येक उद्योगाचे प्रश्न वेगवेगळे असतात. जमिनीच्या वाढत्या किमती, विजेचे वाढते दर या घटकांमुळेही उद्योगवाढीला मर्यादा येतात. महाराष्ट्रातील अनेक भागांमधून या कारणांमुळे शेजारच्या राज्यात उद्योजक स्थलांतरित होत आहेत, असेही भडकमकर यांनी या वेळी सांगितले.

आपण जागतिकीकरण स्वीकारल्यामुळे शासकीय पातळीवर आपण चीनच्या उत्पादनांवर बहिष्कार टाकू शकत नाही. मात्र चिनी मालाविषयी असा भयगंड बाळगण्याऐवजी त्यांच्यापेक्षा उत्तम आणि दर्जेदार वस्तू बनवून त्या जगात विकण्याची ईर्षां आपण मनात बाळगायला हवी, असेही भडकमकर या वेळी म्हणाले.

देशात उद्योग व्यवसायाला चालना देण्याचे धोरण राबविले जात असले तरी पुढील पिढय़ांमध्ये उद्योग संक्रमित होण्याचे प्रमाण कमी होत चालले आहे. पहिल्या पिढीतून दुसऱ्या पिढीत उद्योगाचा वारसा संक्रमित होण्याचे प्रमाण अवघे ३५ टक्के आहे. तिसऱ्या पिढीत तर अवघे १२ ते १५ टक्के उद्योग टिकले आहेत. चौथ्या पिढीत हे प्रमाण अवघे चार टक्के आहे. आपल्याकडे शासकीय स्तरावरील भ्रष्टाचाराविषयी फार बोलले, लिहिले जाते. मात्र खासगी क्षेत्रातही मोठय़ा प्रमाणात गैरव्यवहार होतात. त्यात अनेकदा मोठय़ा उद्योगांकडून छोटय़ा उद्योगांवर अन्याय केला जातो. मोठे उद्योजक छोटय़ा उद्योजकांची आर्थिक कोंडी करतात. मात्र त्याविरुद्ध ‘ब्र’ काढण्याचीही सोय नसते.

अनेकदा व्यक्तीकेंद्री व्यवस्थेमुळे उद्योगवाढीला मर्यादा येतात. उद्योगवाढीसाठी नवे विचार, उपाय आणि तंत्रज्ञान स्वीकारणे आवश्यक आहे. त्यासाठी कंपनीच्या संचालक मंडळात विशिष्ट कालावधीसाठी काही बाहेरील तज्ज्ञांना संचालक म्हणून नेमता येते. व्यवस्थापनात योग्य ते बदल करण्यासाठी अशा प्रकारचे प्रयोग उपयोगी ठरतात, असेही शंतनू भडकमकर यांनी सांगितले.

First Published on September 13, 2017 2:38 am

Web Title: business industry business risk shantanu bhadkamkar