News Flash

ओएनजीसी, हिंदुस्तान पेट्रोलियम ‘एमआरपीएल’मधील हिस्सा विकणार!

शेअर बाजारात सूचिबद्ध कंपनीने किमान २५ टक्के सार्वजनिक भागभांडवली राखणे बंधनकारक

ओएनजीसी, हिंदुस्तान पेट्रोलियम ‘एमआरपीएल’मधील हिस्सा विकणार!
पीटीआय, नवी दिल्ली
सार्वजनिक क्षेत्रातील ओएनजीसी आणि हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (एचपीसीएल) यांनी मंगलोर रिफायनरी अ‍ॅण्ड पेट्रोकेमिकल्स लि. (एमआरपीएल)मधील आपला भागभांडवली हिस्सा विकावा लागण्याची चिन्हे आहेत. शेअर बाजारात सूचिबद्ध कंपनीने किमान २५ टक्के सार्वजनिक भागभांडवली राखणे बंधनकारक असल्याने या दोन कंपन्यांना हे पाऊल टाकावे लागणार आहे. ‘एमआरपीएल’मधील प्रवर्तक आणि वित्तसंस्था यांच्या व्यतिरिक्त सार्वजनिक भागभांडवलाचे प्रमाण अवघे ११.४२ टक्के इतके आहे. ‘सेबी’ने घालून दिलेल्या किमान २५ टक्क्यांच्या दंडकाच्या ते निम्मेही नाही. पुढील वर्षी ऑगस्टपर्यंत ते २५ टक्के पातळीवर नेणे कंपनीला बंधनकारक ठरणार आहे. ओएनजीसीची या कंपनीतील भांडवली मालकी ७१.६३ टक्के आहे, तर एचपीसीएलचा भांडवली हिस्सा १६.९६ टक्के असा आहे. त्यामुळे २५ टक्के सार्वजनिक मालकीचा दंडक पाळायचा झाल्यास, या दोन्ही कंपन्यांना त्यांच्याकडील २३.२ कोटी समभागांची विक्री करावी लागेल. एमआरपीएलच्या संचालक मंडळाच्या १ ऑगस्टला होत असलेल्या बैठकीत या संबंधाने ठोस निर्णय घेतला जाणे अपेक्षित आहे.

आठ बँकांवर दंड
व्यापार प्रतिनिधी, मुंबई
‘तुमचा ग्राहक जाणून घ्या’ (केवायसी) अंतर्गत अटींचे पालन न होणाऱ्या बँकांविरुद्धची रिझव्‍‌र्ह बँकेची कारवाई बुधवारी अधिक विस्तारली. सार्वजनिक तसेच खासगी क्षेत्रातील मिळून सात बँकांवर १२ कोटी रुपयांचा दंड आकारला गेला आहे. त्याचबरोबर देशातील सर्वात आघाडीच्या सार्वजनिक क्षेत्रातील स्टेट बँकेसह सार्वजनिक क्षेत्रातील अन्य दोन व पाच खासगी बँकांना याबाबत तंबी दिली आहे. ‘केवायसी’चे पालन न केल्याबद्दल कॅनरा बँक (रु. दोन कोटी), कॉर्पोरेशन बँक (रु. एक कोटी), स्टेट बँक मैसूर (रु. एक कोटी), स्टेट बँक ऑफ बिकानेर अँड जयपूर (रु. दोन कोटी) व सिंडिकेट बँक (रु. तीन कोटी) यांना बुधवारी दंड जाहीर करण्यात आला. तर खासगी क्षेत्रातील इंडसइंड बँक (रु. दोन कोटी) व आरबीएल बँक (रु. एक कोटी) यांना दंड करण्यात आला आहे.

वामन हरी पेठे ज्वेलर्स रत्न बाजारपेठेत
प्रतिनिधी, मुंबई
तयार दागिन्यांसाठी लोकप्रिय असलेल्या वामन हरी पेठे ज्वेलर्सने आता रत्न बाजारपेठेत शिरकाव केला असून ‘९रत्न’ ही नवी नाममुद्रा विकसित केली आहे.
शतकोत्तर वाटचाल करणाऱ्या वामन हरी पेठे ज्वेलर्सने या माध्यमातून प्रमाणित रत्न वाजवी दरात उपलब्ध करून देत असल्याचा दावा केला आहे. विविध ५५ डिझाइन्समधून या रत्नांची पसंती खरेदीदाराला देण्याची सोय यामार्फत करण्यात आली आहे. याद्वारे १५ दिवसांचा परीक्षण कालावधीही ग्राहकांना देऊ केला आहे, अशी माहिती वामन हरी पेठे ज्वेलर्सचे भागीदार आदित्य पेठे यांनी दिली. सराफ पेढीच्या विविध दालनांबरोबरच अ‍ॅमेझॉन, फ्लिपकार्ट आदी ई-कॉमर्स मंचावरही ते खरेदीसाठी उपलब्ध आहे.

‘एक्झर्बिया’च्या दोन प्रकल्पासाठी नोंदणी सुरू
प्रतिनिधी, मुंबई
एक्झर्बिया या स्थावर मालमत्ता विकासक कंपनीचे पुणे आणि पनवेलजवळील परवडणाऱ्या किमतीतील गृहनिर्माण प्रकल्पांसाठीची नोंदणी सुरू झाली असून अंतिम मुदत ३१ जुलै २०१६ असल्याचे तिने स्पष्ट करण्यात आले आहे.
मुंबई-पुणे जुन्या महामार्गादरम्यान असलेल्या ओन्ली व्हिला टाऊनशिप माडव व तळेगाव (अंबी) येथे साकारात असलेले हे प्रकल्प केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटी योजनेला अनुसरून साकारण्यात येत आहे. या संपूर्ण परिसरात आकार घेत असलेल्या अनेक नवीन पायाभूत सोयी-सुविधांमुळे या ठिकाणाला येत्या काळात अनन्य साधारण महत्त्व येणार असल्याचा दावा कंपनीतर्फे करण्यात आला आहे.

कल्याण जनता बँकेची ‘ई-लॉबी’
प्रतिनिधी, ठाणे
कल्याण जनता सहकारी बँकेच्या रामबाग येथील शाखेत अलीकडेच ई-लॉबी प्रणालीचे उद्घाटन नुकतेच करण्यात आले. या ई-लॉबीमध्ये एटीएम, कॅश डिपॉझिटरी यंत्रणा, चेक ड्रॉप सुविधा आदी सोयी आहेत. बँकेचे अध्यक्ष अ‍ॅड. सुरेश पटवर्धन, मुख्य कार्यकारी अधिकारी अतुल खिरवाडकर, संचालक मोहन आघारकर, स्थानिक नगरसेविका वीणा जाधव या वेळी उपस्थित होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 28, 2016 7:34 am

Web Title: business news 13
Next Stories
1 …आणि सरकारला राजन यांच्यापुढे नमते घ्यावे लागले
2 कोळसा खाणी लिलावात ‘रालोआ’चे हातही ‘काळे’!
3 स्पर्धक जबाँग अखेर मिंत्राच्या ताब्यात
Just Now!
X