प्रत्येक खरेदीदाराला खात्रीने बक्षीस मिळवून देणाऱ्या हिरो सायकल्सने ऑक्टोबरच्या मध्यापासून सुरू केलेल्या ‘स्क्रॅच अँड विन’ योजनेला ग्राहकांकडून उमदा प्रतिसाद मिळत असून, आजवर अनेकांनी बक्षिसेही मिळविली आहेत. हिरो जेट गोल्ड ब्लॅक सायकल खरेदी करणारे मुझफ्फरनगर स्थित अंकुर शर्मा या ग्राहकांनी याच योजनेतून मारुती अल्टो कार जिंकली आहे. कार विजेत्या ग्राहकाला हिरो सायकल्सचे व्यवस्थापकीय संचालक पंकज मुंजाल यांनी अलीकडेच कारची चावी बहाल केली. महाराष्ट्रात पिंपळगावस्थित धरमचंद सोनी या ग्राहकाने स्प्लेंडर मोटरसायकल याचप्रमाणे बक्षीसरूपात मिळविली आहे. १५ डिसेंबपर्यंत सुरू असलेल्या या योजनेत ग्राहकांना  मोबाइल फोन, मनगटी घडय़ाळे, एलईडी टीव्ही, अ‍ॅपल आय-पॅड वगैरे अनेक बक्षिसे जिंकता येतील.

जेट इन्फ्राव्हेन्चर बाजारात सूचिबद्ध
मुंबई: अलीकडेच प्रारंभिक खुली भागविक्री यशस्वीपणे पार पडणाऱ्या जेट इन्फ्राव्हेन्चर लिमिटेड या कंपनीचे समभाग मंगळवारी मुंबई शेअर बाजाराच्या बीएसई-एसएमई मंचावर सूचिबद्ध झाले. या स्थावर मालमत्ता विकासक कंपनीच्या भागविक्रीची प्रक्रिया पँटोमाथ कॅपिटल अ‍ॅडव्हायजर्स (प्रा.) लिमिटेड या कंपनीने पार पाडली होती. समभागांची  प्रत्येकी १२५ रुपये किमतीने विक्री झाली आणि पदार्पणाच्या दिवसातील व्यवहारात या समभागांनी चार टक्क्यांनी वाढ दाखवीत १३३.९० रुपयांचा उच्चांक गाठला. भागविक्रीतून उभारलेल्या ४.५० कोटी रुपयांचा निधी कंपनी खेळते भांडवल म्हणून वापरणार आहे.

‘डीएचएफएल’चा सदिच्छादूत म्हणून शाहरुख करारबद्ध
मुंबई: गृहवित्त क्षेत्रातील देशातील दुसरी मोठी कंपनी डीएचएफएलने स्थापनेचे ३०वे वर्ष साजरे करताना, बॉलीवूड अभिनेता शाहरुख खानला आपला सदिच्छादूत म्हणून करारबद्ध केले. डीएचएफएलचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक कपिल वाधवान यांच्या उपस्थितीत झालेल्या समारंभात शाहरुखने करारावर स्वाक्षऱ्या केल्या. देशभरात ५५० ठिकाणी सेवा केंद्रे असलेल्या डीएचएफएलच्या आगामी राष्ट्रीय प्रचार-प्रसार मोहिमेत शाहरुखचा सहभाग या करारान्वये निश्चित करण्यात आला आहे.