मुंबई: इंडियन ऑइल कॉर्पोरेशनने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानुसार, महात्मा गांधी यांच्या स्वप्नातील स्वच्छ भारत साकारण्याच्या मोहिमेला पाठिंबा दर्शवीत त्याची अंमलबजावणी आपल्या ३४ हजार कर्मचारी वर्गाकडून मंगळवारपासून सुरू केली. या मोहिमेचा शुभारंभ कंपनीच्या विपणन विभागाचे वांद्रे (पूर्व) येथील मुख्यालयात, इंडियन ऑइलचे कर्मचारी क्रिकेटपटू रोहित शर्मा, कंपनीचे कार्यकारी संचालक (मनुष्यबळ) एच. एस. बेदी आणि कार्यकारी संचालक (संपर्क आणि ब्रॅँडिंग) एस. एस. बापट यांनी स्वत: झाडू हाती घेऊन केला.  ही मोहिम देशभरात कंपनीच्या ४०,००० सेवा केंद्रे, २४ हजार पेट्रोल पंप्स आणि सात हजार इंडेन या स्वयंपाकाच्या गॅसच्या वितरकांच्या परिसरात टप्प्याटप्प्याने राबविण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे. शिवाय कंपनीचे रिफायनरी प्रकल्प, पाइपलाइनची ठिकाणे, बल्क स्टोरेज टर्मिनल्स व डेपो, एलपीजी बॉटलिंग केंद्रे आणि विमान इंधन केंद्रांच्या आवारांतही ही स्वच्छता मोहिम राबविली जाणार आहे.

कॉसमॉस बँकेची बोरिवली (पूर्व) येथे नवीन शाखा
मुंबई : बहुराज्यीय शेडय़ुल बँक असलेल्या कॉसमॉस को-ऑपरेटिव्ह बँकेच्या मुंबईत बोरिवली (पूर्व) येथील शाखेचे अलीकडेच बँकेचे अध्यक्ष कृष्णकुमार गोयल यांच्या हस्ते उद्घाटन झाले. सात राज्यांमध्ये विस्तार फैलावलेल्या आणि २५,३०० कोटींचा एकूण व्यवसाय असलेल्या या बँकेची ही १३५वी शाखा आहे. विद्यमान २०१४-१५ आर्थिक वर्षांअखेर बँकेने आणखी १० शाखा सुरू करण्याचा संकल्प केला असून, यातील चार तामिळनाडूमध्ये, तर मुंबईसह महाराष्ट्रात सहा शाखा सुरू होत असल्याची माहिती गोयल यांनी दिली.

‘राजकोट नागरिक’ची मुंबईत दुसरी शाखा
मुंबई : सौराष्ट, गुजरातमधील आघाडीची नागरी सहकारी बँक असलेल्या राजकोट नागरिक सहकारी बँकेच्या मुंबईतील दुसऱ्या शाखेचे घाटकोपर (पूर्व) येथे रविवारी, गुजरातच्या मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल यांच्या हस्ते उद्घाटन झाले. या वेळी खासदार किरीट सोमय्या हेही उपस्थित होते. २.६४ लाख सभासद असलेल्या राजकोट नागरिकच्या नव्या शाखेसह एकूण ३२ शाखा झाल्या आहेत. ३११४ कोटींच्या ठेवी, तर १,७३६ कोटींचे कर्ज वितरण असलेल्या या बँकेने ६२ वर्षांच्या कार्यकाळात ‘छोटय़ा लोकांची मोठी बँक’ हे ब्रीद कायम पाळले आहे, असे तिचे अध्यक्ष ज्योतिंद्र मेहता यांनी सांगितले. ‘सहकार भारती’चे राष्ट्रीय अध्यक्ष सतीश मराठे हेही बँकेच्या संचालक मंडळावर आहेत. बँकेच्या काळबादेबी येथील मुंबईतील पहिल्या शाखेच्या उद्घाटनाला गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी हे उपस्थित होते.