देशातील सर्वात मोठी सॉफ्टवेअर सेवा कंपनी आणि १० अब्ज डॉलरपुढे उत्पन्न असणाऱ्या टाटा कन्सल्टन्सी सव्‍‌र्हिसेस (टीसीएस) ने जगातील पहिल्या १० आयटी कंपन्यांमध्ये स्थान पटकावले आहे. महसूल आणि नफावाढीच्या जोरावर कंपनीने यापूर्वीचे १३ वे स्थान मागे टाकले आहे. डिसेंबर २०१३ अखेर १२.५ अब्ज डॉलरचा महसूल मिळविणाऱ्या टीसीएसचा महसूल दशकापूर्वी अवघा एक अब्ज डॉलरच्या घरात होता. ‘एचएफएस रिसर्च’द्वारे जागतिक स्तरावरील आघाडीच्या माहिती तंत्रज्ञान कंपन्यांच्या सूचीमध्ये भारतातील दुसऱ्या क्रमांकाच्या इन्फोसिसचा क्रम १८ व्या स्थानावर आहे. तिने अवघ्या एका क्रमाने उडी मारली आहे. तर विप्रो २३ वरून २० व्या क्रमांकावर आली आहे. एचसीएल टेकचाही क्रम २७ वरून सुधारत २५ झाला आहे. जागतिक स्तरावर ५४.३ अब्ज डॉलर महसूलासह आयबीएम सर्वोच्च स्थानावर आहे.
रुपयाचा एप्रिल तळ कायम
भारतीय चलनाचे अवमूल्यन दुसऱ्या दिवशीही कायम राहताना रुपया मंगळवारी १७ पैशांनी आणखी घसरला. डॉलरच्या समोर स्थानिक चलन ६०.७६च्या नरमाईवर आले. यामुळे रुपयाचा महिन्याचा नीचांक कायम राहिला आहे. दुसऱ्याही सत्रात भांडवली बाजार सर्वोच्च स्थानाला गवसणी घालत असताना आयातदारांकडून विदेशी चलनाच्या मागणीपोटी रुपया कमकुवत बनले आहे. ३० पैशांच्या मोठय़ा घसरणीने रुपया सप्ताहारंभीच्या व्यवहारातही महिन्याच्या तळाला गेला होता. चलनाची यापूर्वीची किमान पातळी २४ मार्च रोजी होती. चलनाची दोन सत्रातील घट ४७ पैशांची राहिली आहे. १० एप्रिलच्या ६०.०७ नंतर रुपया यापूर्वी सलग तीन व्यवहारात ३० पैशांनी रोडावला होता. १७ एप्रिलच्या ८ पैशांच्या भक्कममुळे प्राप्त झालेले चलनाचे ६०.२९ हे स्थान आता पुन्हा डळमळीत होऊ लागले आहे.
‘वंडरेला’ला भागविक्रीत किरकोळ गुंतवणूकदारांचा दीडपटीने भरणा
मुंबई : भागविक्रीच्या माध्यमातून निधी उभारणी करणाऱ्या मनोरंजन उद्यान क्षेत्रातील वंडरेला हॉलिडेज्ला किरकोळ गुंतवणूकदारांकडून चांगला प्रतिसाद लाभत आहे. मंगळवारी दुसऱ्या दिवशीच्या भागविक्री प्रक्रियेला किरकोळ गुंतवणूकदारांनी १.४५ पट प्रतिसाद दिला. दुसऱ्या दिवसअखेर भागविक्रीचा एकूण ९८ टक्के भरणा झाला आहे. कंपनीने विक्रीसाठी उपलब्ध केलेल्या १.४५ कोटी समभागांसाठी पहिल्या दिवशीही ४२ टक्के प्रतिसाद लाभला होता. मान्यताप्राप्त संस्थागत खरेदीदारांची श्रेणीने ६८ टक्के नोंदणी केली आहे. तर बिगर संस्थागत गुंतवणूकदारांची स्थिती ५३ टक्के नोंदणीवर राहिली आहे. नव्या उद्यान उभारणीसाठी १८० कोटी रुपये भांडवलाचे लक्ष्य राखणाऱ्या दक्षिणेतील या कंपनीची भागविक्री प्रक्रिया बुधवारी संपुष्टात येत आहे. समभागासाठी कंपनीने प्रत्येकी १० रुपये दर्शनीमूल्याच्या समभागासाठी ११५ ते १२५ रुपये असा किंमतपट्टा निश्चित केला आहे.