वामन हरी पेठे या दागिने क्षेत्रातील पेढीने कलर्स हे कलेकशन सादर केले आहे. पेढीच्या विलेपार्ले (पश्चिम) येथील दालनात अभिनेत्री रविना टंडन हिच्या हस्ते त्याचे सादरीकरण करण्यात आले. पेण्डण्ट नेकलेस, ब्रेसलेट, इअररिंग्ज आदी आभूषणे या प्रकारात उपलब्ध करून देण्यात आली आहेत. १८ आणि २२ कॅरेटमध्ये विविध दागिने प्रकारही यात आहेत. पेढीचे संचालक आदित्य पेठे यावेळी म्हणाले की, विविध रंगांच्या माध्यमातून ग्राहकांना त्यांचे जीवन अधिक रंगबिरंगी करण्याचा प्रयत्न या सादरीकरणामागे आहे.
प्रेसमनच्या रुपात पहिली जाहिरात संस्था प्रमुख भांडवली बाजारात
मुंबई : भारतीय जाहिरात क्षेत्रातील पहिल्या कंपनीची नोंदणी प्रमुख भांडवली बाजारात झाली आहे. प्रेसमन आता मुंबई शेअर बाजाराबरोबरच देशातील सर्वात मोठय़ा राष्ट्रीय शेअर बाजारातही सूचिबद्ध झाली आहे. प्रेसमन ही जाहिरात संस्था एच. सी. सुचांती यांनी स्थापन केली असून ती कर्जमुक्त कंपनी आहे. मार्च २०१३ अखेर कंपनीचा राखीव तसेच शिलकीचा निधी १३.७४ कोटी रुपये असून समभाग भांडवल ४.६९ कोटी रुपये आहे. गेल्या आर्थिक वर्षअखेर कंपनीने ६.२८ कोटी रुपये निव्वळ नफा मिळविला.
कोकूयो कॅमलिनच्या रंग स्पर्धेकरिता शाळांना आवाहन
कोकूयो कॅमलिन लिमिटेडमार्फत गेल्या चार दशकांपासून घेतले जाणाऱ्या देशव्यापी रंग स्पर्धेत मुलांना सहभागा होता यावे यासाठी शाळांना प्रवेशिकेसाठी आवाहन करण्यात आले आहे. याबाबत कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी ए. श्रीकांत यांनी यानिमित्ताने एका विवरण पुस्तिकेचे अनावरण केले. यामध्ये स्पर्धेतील नियम व अटी विषद करण्यात आल्या आहेत. यंदा या उपक्रमात ५ हजार शाळा सहभागी होण्याचा अंदाज त्यांनी व्यक्त केला. कंपनीचे मुख्य विपणन अधिकारी सौमित्र प्रसाद यांनी या स्पर्धेने २०११ मध्ये जागतिक विक्रम स्थापित केल्याची आठवण केली. तर २०१२ मध्ये ५० लाख विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला होता.
ओम चिंतामणी ज्वेलर्सची नॅनो खरेदीची संधी
मुंबई : कल्याण येथील ओम चिंतामणी ज्वेलर्सने वर्धापन दिनाच्या निमित्ताने सोने खरेदीवर नॅनो जिंकण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे. सोने खरेदी योजनेत पहिले बक्षिस टाटाची नॅनो तर दुसरे बक्षिस दुचाकी व तिसऱ्या बक्षिसामध्ये एलईडी टीव्ही यांचा समावेश आहे. सोने, हिरे आदींच्या दागिन्यांच्या घडणावळीवर २५ ते ५० टक्क्य़ांपर्यंत सूटही देऊ केली आहे. येत्या दिवाळीपर्यंत ग्राहकांना या योजनेत सहभागी होता येईल, अशी माहिती संचालक नंदलाल विसपुते व व्यवस्थापकीय संचालक राजकपिल विसपुते यांनी दिली.