‘सेन्सेक्स’ २० हजाराखाली
रिझव्‍‌र्ह बँकेच्या व्याजदर कपातीचे तब्बल द्विशतकी वाढीने स्वागत करणाऱ्या मुंबई शेअर बाजारात दिवसअखेर गुंतवणूकदारांनी नफेखोरी केल्याने ‘सेन्सेक्स’ला २० हजाराच्या खाली यावे लागले. दिवसाच्या सुरुवातीच्या टप्प्यावर व्याजदराशी निगडित बांधकाम, वाहन, बँक, भांडवली वस्तू क्षेत्रातील चढय़ा मूल्यांवर असलेल्या समभागांची गुंतवणूकदारांनी व्यवहारांती विक्री केल्याने ‘सेन्सेक्स’मध्ये शतकी घसरण नोंदविली गेली.
११२.४५. अंश नुकसानासह मुंबई निर्देशांक १९,९९०.९० वर तर २४.९० अंश घसरणीसह राष्ट्रीय शेअर बाजाराचा ‘निफ्टी’ ६,०४९.९० वर थांबला.  सकाळच्या सत्रातही भांडवली बाजाराची सुरुवात कालच्या कलानेच राहिली. सोमवारी किरकोळ घसरणीसह बंद झालेल्या मुंबई निर्देशांकाने मंगळवारची सुरुवात ३१ अंश घसरणीने केली. व्याजदर कपातीच्या आशेने रिझव्‍‌र्ह बँकेच्या तिमाही पतधोरणाकडे डोळे लावून बसलेल्या गुंतवणूकदारांनी व्यवहारात यावेळी फारसा उत्साह दाखविला नाही. सकाळी रिझव्‍‌र्ह बँकेने व्याजदर कपात जाहीर करताच ‘सेन्सेक्स’ जवळपास शतकी तेजीसह २०,२०० च्या वर पोहोचला.