15 December 2017

News Flash

बिल गेट्स नव्हे, तर ‘ही’ आहे जगातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती

एकूण संपत्ती तब्बल ९०.९ अब्ज डॉलर्स

लोकसत्ता ऑनलाइन | Updated: July 28, 2017 12:35 PM

अॅमेझॉनचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी जेफ बेझोस (संग्रहित छायाचित्र)

जगातील सर्वात मोठी ऑनलाइन रिटेलर कंपनी असलेल्या अॅमेझॉनचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी जेफ बेझोस जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती ठरले आहेत. अॅमेझॉनच्या समभागांच्या किंमतीमध्ये वाढ झाल्याने बेझोस यांच्या संपत्तीत मोठी वाढ झाली आहे. बेझोस यांच्याकडे एकूण ९०.९ अब्ज डॉलरची संपत्ती असून त्यांनी मायक्रोसॉफ्टच्या बिल गेट्स यांना मागे टाकले आहे. बिल गेट्स यांच्याकडे असणाऱ्या संपत्तीचे एकूण मूल्य ९०.७ अब्ज डॉलर इतके आहे. ब्ल्यूमबर्गने याबद्दलचे वृत्त दिले. पण  जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती होण्याचा मान  फक्त काही तासांपूरताच जेफ यांना मिळाला.

गुरुवारी न्यूयॉर्क शेअर बाजार सुरु होताच अॅमेझॉनच्या समभागांच्या किमतीत वाढ झाली. अॅमेझॉनच्या समभागांमध्ये १.३ टक्क्यांची वाढ झाल्याने त्यांची किंमत १ हजार ६५ डॉलरवर जाऊन पोहोचली. त्यामुळे बेझोस यांच्या संपत्तीचे एकूण मूल्य ९०.९ अब्ज डॉलर इतके झाले. अॅमेझॉनच्या तिमाही महसुलात ३७.२ अब्ज डॉलर्सची वाढ होण्याची शक्यता ब्ल्यूमबर्गने व्यक्ती केली आहे. कंपनीच्या मागील वर्षाच्या महसुली उत्पन्नाच्या तुलनेत ही वाढ २२ टक्के इतकी आहे. त्यामुळेच बिल गेट्स यांना मागे टाकत जगातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती होण्याचायादीत काही तासांपुरता का होईना बेझोस विराजमान झाले. गेल्या वर्षभराचा विचार केल्यास बेझोस यांच्या संपत्तीत १०.२ अब्ज डॉलर्सची वाढ झाली आहे.

तीन महिन्यांपूर्वीच जेफ बेझोस जगातील श्रीमंत व्यक्तींच्या यादीत दुसऱ्या स्थानी जाऊन पोहोचले होते. त्यावेळी त्यांनी अॅमान्किओ ऑर्तेगा आणि वॉरन बफेट यांना मागे टाकले होते. मात्र अवघ्या तीनच महिन्यांमध्ये जेफ बेझोस जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती ठरले. पण गुरूवारी शेअर बाजार बंद होण्याच्या सुमारास अॅमेझॉनच्या समभागांमध्ये घसरण झाली त्यामुळे ते पहिल्या क्रमांकावरून पुन्हा दुसऱ्या क्रमांकावर आले.  सौयो डॉट कॉम ही ऑनलाईन रिटेलर कंपनी विकत घेण्याची घोषणा अॅमेझॉनकडून करण्यात आल्यावर त्यांच्या समभागांच्या किमतीत वाढ नोंदवण्यात आली. सौयो डॉट कॉम ही मध्य आशियातील सर्वात मोठी ऑनलाईन रिटेलर कंपनी आहे.

First Published on July 27, 2017 10:42 pm

Web Title: by overtaking bill gates amazon founder jeff bezos becomes the richest man of the world