नवी दिल्ली : देशातील पहिल्या कंपनी रोखे ईटीएफला अर्थात ‘भारत बाँड एक्सचेंज ट्रेडेड फंड’ला (ईटीएफ) केंद्रीय मंत्रिमंडळाने मान्यता दिल्याची घोषणा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी बुधवारी येथे केली.

तत्कालिन अर्थमंत्री अरुण जेटली यांनी फेब्रुवारी २०१८ मधील अर्थसंकल्पीय भाषणात सरकारच्या कंपन्यांचा ईटीएफ सुरू करणार असल्याची घोषणा केली होती.

भारत बॉन्ड ईटीएफ हा भारतात सुरू होणारा पहिला कंपनी रोखे ईटीएफ असेल. किरकोळ गुंतवणूकदारांना भारत बाँड ईटीएफमध्ये किमान १,००० रुपये गुंतवणूक करण्याची अनुमती असून भारत बॉन्ड ईटीएफला ‘आम जनता’ किंवा ‘आम आदमी’ लक्ष्य असल्याची माहिती सीतारामन यांनी दिली. या माध्यमातून सरकारला निधी उभारणी करता येणार आहे. या ईटीएफमध्ये समावेश असलेल्या कंपन्यांचा तपशील संबंधितांशी चर्चा झाल्यानंतर निश्चित केला जाईल, असे अर्थमंत्री म्हणाल्या.

म्युच्युअल फंडांची शिखर संघटना असलेल्या ‘अ‍ॅम्फी’चे मुख्य कार्यकारी अधिकारी एन. एस. व्यंकटेशन यांनी सांगितले की, भारत बॉंड ईटीएफची घोषणा ही किरकोळ गुंतवणूकदारांसाठी असून भारतीय रोखे बाजारासाठी हा एक ऐतिहासिक क्षण असून  अत्यंत कमी गुंतवणुकीत ईटीएफ संरचनेद्वारे दर्जेदार सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांच्या रोख्यात गुंतवणूक करणे शक्य होईल, अशी प्रतिक्रिया दिली.

या  ईटीएफचे व्यवस्थापन करण्यासाठी सरकारने निवड केलेल्या एडलवाईज म्युच्युअल फंडाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी राधिका गुप्ता यांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले की, केंद्रीय मंत्रिमंडळाने भारत बाँड ईटीएफला मान्यता दिल्यानंतर भारतीय गुंतवणूकदारांसाठी या प्रकारचे गुंतवणूक साधन उपलब्ध करून देण्याची आम्ही उत्सुक असून हे उत्पादन भारतातील किरकोळ गुंतवणूकदारांना रोकड सुलभता कर कार्यक्षमतेसह, किमान १,००० रुपयांमध्ये सार्वजनिक क्षेत्रातील सर्वोत्तम कंपन्यांच्या रोख्यांमध्ये गुंतवणूक करण्याची संधी देत आहे.