News Flash

जागतिक अव्वल ५० बँकांमध्ये स्थान देणाऱ्या स्टेट बँक विलीनीकरणाला मंत्रिमंडळाची मंजुरी

भारतीय महिला बँकेच्या मुख्य स्टेट बँकेतील विलीनीकरणाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी

भारतीय महिला बँकही होणार विलीन

पाच सहयोगी स्टेट बँका व दोन अडीच वर्षे जुन्या भारतीय महिला बँकेच्या मुख्य स्टेट बँकेतील विलीनीकरणाला केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी मंजुरी दिली. यामुळे देशातील सर्वात मोठी स्टेट बँक ही मालमत्तेबाबत जगातील पहिल्या ५० बँकांच्या पंक्तीत जाऊन बसली आहे.
एकत्रीकरणामुळे देशातील सार्वजनिक बँकेची एकूण मालमत्ता ३७ लाख कोटी रुपये होणार असून तिच्या एकत्रित शाखांची संख्या २२,५०० तर एटीएमचे जाळे ५८,००० पर्यंत विस्तारणार आहे. स्टेट बँकेचे सध्या विविध ३६ देशांमध्ये १९८ कार्यालयांद्वारे अस्तित्व आहे.
बुधवारच्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विलीनीकरणाच्या शिक्कामोर्तबतेनंतर मुख्य स्टेट बँकेच्या पाचपैकी भांडवली बाजारात सूचिबद्ध तीन सहयोगी बँकांचे समभाग मूल्य २० टक्क्य़ांपर्यंत झेपावले. तर स्टेट बँकेचा समभाग सत्रअखेर ४ टक्क्य़ांपर्यंत वाढला.
स्टेट बँकेच्या सध्या पाच सहयोगी बँका आहेत. स्टेट बँक ऑफ बिकानेर अ‍ॅन्ड जयपूर, स्टेट बँक ऑफ त्रावणकोर, स्टेट बँक ऑफ मैसूर, स्टेट बँक ऑफ पटियाला व स्टेट बँक ऑफ हैदराबाद यांच्या मुख्य बँकेतील विलिनीकरणाचा प्रस्ताव मुख्य स्टेट बँकेने गेल्या महिन्यात सरकारकडे सादर केला होता.

याचबरोबर महिलांसाठी नोव्हेंबर २०१३ मध्ये खास स्थापन करण्यात आलेल्या भारतीय महिला बँकेला ताब्यात घेण्याची इच्छाही या प्रस्तावाद्वारे प्रदर्शित केली होती. एकटय़ा स्टेट बँकेच्या देशभरात सध्या १६,५०० शाखा आहेत.
स्टेट बँक ऑफ सौराष्ट्र (२००८) व स्टेट बँक ऑफ इंदूर (२०१०) या दोन सहयोगी बँकांचे यापूर्वीच मुख्य बँकेत विलीनीकरण झाले आहे. अन्य पाच सहयोगी बँकांचे विलीनीकरण कर्मचारी संघटनेच्या विरोधामुळे लांबले होते.पाच सहयोगी बँका ताब्यात घेण्यासाठी मुख्य स्टेट बँकेला प्रत्येकी २,००० कोटी रुपयांचा खर्च येणार असल्याचे प्राथमिक गणित मांडले जात आहे. पैकी सूचिबद्ध तीन सहयोगी बँकांमध्ये स्टेट बँकेचा मोठा हिस्सा असल्याने बँकेकरिता हा व्यवहार काहीसा अधिक खर्चीक ठरणार आहे.
भारतात सध्या सार्वजनिक क्षेत्रातील २७ बँका कार्यरत आहेत. ही संख्या नजीकच्या भविष्यात ७ ते ८ वर आणून देशात केवळ काही मोठय़ा बँकांच अस्तित्वात असाव्यात, असा सरकारचा प्रयत्न आहे.

सर्वासाठी लाभदायी
सहयोगी बँकांच्या मुख्य बँकेतील विलीनीकरणाच्या प्रस्तावाला केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिल्यानंतर दोहोंसाठी ही लाभदायी बाब ठरणार आहे. यामुळे मुख्य स्टेट बँकेचे जाळे देशभरात अधिक विस्तृत होईल. विलीनीकरणानंतर सहयोगी व मुख्य बँकेत असलेल्या अनेक सामायिक बाबींचा उपयोग करून घेता येईल. जागतिक स्तरावर स्टेट बँकेचे स्थान आता अधिक उंचावणार आहे. सहयोगी बँकांच्या खातेदारांचा लाभ मुख्य बँकेला होईल. तसेच मुख्य बँक आगेकूच करत असलेल्या माहिती तंत्रज्ञानावरील ग्राहक सेवेचा उपयोग सहयोगी बँकांना होईल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 16, 2016 7:50 am

Web Title: cabinet approves merger of 5 associate banks with sbi stocks surge
टॅग : Loksatta,Sbi
Next Stories
1 सरकारच्या धोरणात्मक सक्रियतेने ‘सेन्सेक्स’मध्ये त्रिशतकी झेप
2 सूक्ष्म वित्त बँकांना परवाने मंजुरीत कथित घोटाळा
3 बँक ऑफ महाराष्ट्रला ‘स्कॉच’ पुरस्कार
Just Now!
X