24 November 2017

News Flash

हाकाटी कॉल दरवाढीची!

एकीकडे स्पर्धात्मकतेचा वाढता दबाव; स्पर्धेत निभाव लागण्यासाठी करावा लागणारा प्रचंड भांडवली खर्च तर दुसरीकडे

व्यापार प्रतिनिधी, मुंबई | Updated: November 9, 2012 2:47 AM

एकीकडे स्पर्धात्मकतेचा वाढता दबाव; स्पर्धेत निभाव लागण्यासाठी करावा लागणारा प्रचंड भांडवली खर्च तर दुसरीकडे कंपनीची नफाक्षमताही टिकवून धरण्याची तारेवरची कसरत आता दूरसंचार कंपन्यांना पेलवेनाशी झाली असून, कॉलदरात वाढ करण्याशिवाय गत्यंतर नाही अशी हाकाटी उठू लागली आहे. दूरसंचार अग्रणी भारती एअरटेलने गुरुवारी एकूणच उद्योगक्षेत्राचे प्रतिनिधित्व करताना दरवाढ अपरिहार्यच ठरेल, असे स्पष्ट प्रतिपादन केले.
गेल्या वर्ष-सहा महिन्यांपासून दूरसंचार सेवा क्षेत्रातील नव्या संक्रमणातून कॉलदरात वाढीबाबत सूतोवाच केले जात असले तरी त्याची सुरुवात आपल्यापासून नको म्हणून अनेक कंपन्यांकडून चालढकल सुरू आहे. भारती एअरटेल मुख्य कार्यकारी अधिकारी संजय कपूर यांनी ‘वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम’च्या मंचावरून बोलताना, आर्थिक दृष्टिकोनातून दरवाढ अटळ ठरते, तर व्यावहारिक बाजू सुरुवात आपल्यापासून नको असे खुणावत असल्याची स्पष्ट कबुली दिली.
कर्जाचा डोंगर डोईजड झालेल्या रिलायन्स कम्युनिकेशन्सने मात्र ऑक्टोबर २०१२ पासून याबाबत आघाडी घेत कॉलदरात सरसकट २५ टक्क्यांची जबर वाढ केली. प्रतिस्पर्धी कंपन्यांकडून त्याचे अनुकरण तेव्हा केले जाईल असे अपेक्षिले जात होते. परंतु स्पर्धेच्या दबावापायी प्रत्यक्षात दरवाढीचे धाडस दूरसंचार कंपन्या करू पाहत नसल्याचा प्रत्यय गुरुवारी पुन्हा आला. एकूण उद्योगक्षेत्राच्या वतीने बोलताना संजय कपूर म्हणाले, ‘दरवाढीचा निर्णय जितका लांबणीवर पडेल तितके ते एकूण उद्योगक्षेत्रासाठी हानिकारक ठरेल. माझ्या मते या निर्णयाबाबत आपण जितकी दिरंगाई करू तितकी ही बाब आपल्याला अधिकाधिक भोवणारी ठरेल.’
परंतु भारती एअरटेलकडून ‘दरवाढी’चा घंटानाद होईल काय असे विचारले असता, ‘मर्दानी धाडस नेहमीच फलदायी ठरते असे नाही. सद्य बाजारस्थिती त्याची परवानगी देत नाही. मी माझ्या भागधारकांनाही उत्तरदायी असून एकीकडे मला कंपनीचा बाजारहिस्सा सांभाळायचा आहे, तर दुसऱ्या बाजूला नफाक्षमताही पाळायची आहे. ही तारेवरची कसरत मला कायमच करावी लागेल.’     

मर्दानी धाडस नेहमीच फलदायी ठरते असे नाही.  मी माझ्या भागधारकांनाही उत्तरदायी असून एकीकडे मला कंपनीचा बाजारहिस्सा सांभाळायचा आहे, तर दुसऱ्या बाजूला नफाक्षमताही पाळायची आहे. ही तारेवरची कसरत मला कायमच करावी लागेल.
– संजय कपूर
‘भारती एअरटेल’चे मुख्याधिकारी

First Published on November 9, 2012 2:47 am

Web Title: call for phone call rate hike