स्वस्त कार म्हणून नॅनोचा प्रसार करणे चुकीचे ठरले, असे स्पष्ट मत टाटा सन्सचे मानद अध्यक्ष रतन टाटा यांनी पुन्हा एकदा व्यक्त केले. राजकीय कारणास्तव सिंगूर प्रकल्प साणंदला हलविल्यानंतर नॅनोतील उत्सुकताच संपुष्टात आली, असेही त्यांनी सांगितले.
नॅनोला स्वस्त कार म्हणून पुढे करणे ही केवळ चूकच नव्हती तर तिची अपेक्षित विक्री न होण्यामागेही हेच कारण होते, असेही टाटा म्हणाले. स्वस्त कारऐवजी माफक दरातील कार म्हणून नॅनोच्या नाममुद्रेवर भर द्यायला हवा होता, असे याबाबत टाटा यांनी म्हटले आहे. प्रत्यक्षात ही कार सादर करण्यास लागलेल्या वर्षभराच्या विलंबानेही तिच्याबाबतचे गैरसमज अधिक पसरले, असेही टाटा म्हणाले.
टाटा मोटर्सने २००८ मध्ये नॅनो ही एक लाखातील कार म्हणून भारतीय वाहन बाजारपेठेत आणली होती. स्वस्त कार म्हणून तिला अधिक प्रसिद्धी मिळाली. त्याचबरोबर छोटी कार म्हणूनही तिच्या विक्रीवर भर देण्यात आला. मात्र सुरुवातीचा कालावधी सोडता नॅनोच्या विक्रीत मासिक तुलनेत घसरणच होत आहे.
चेन्नई येथे ग्रेट लेक्स इन्स्टिटय़ूट ऑफ मॅनेजमेंटच्या पदवीदान समारंभानिमित्ताने विद्यार्थ्यांच्या प्रश्नाच्या उत्तरात त्यांनी हे मत व्यक्त केले. लोकांना स्वस्त कारचा मालक म्हणून स्वत:ला संबोधणे आवडत नाही; २५ ते २६ वयोगटातील व्यक्तींच्या सहकार्याने नॅनो तयार करण्यात आल्याने तिला तुलनेत यशही आले; मात्र तीकडून अधिक अपेक्षा होती, असे टाटा म्हणाले.
तुम्ही अन्यपेक्षा वेगळे काही तरी करा; आणि तुम्ही कराल ते योग्यच असेल, याची ग्वाही द्या, असा मंत्र टाटा यांनी यावेळी विद्यार्थ्यांना दिला. इ-कॉमर्समध्ये मोठय़ा प्रमाणात वैयक्तिक गुंतवणूक करणाऱ्या टाटा यांनी यावेळी नव उद्यमींबाबत दीर्घ कालावधीसाठी या व्यवसायात राहायला हवे, अशी अपेक्षा व्यक्त केली. इ-कॉमर्स ही बाजारपेठ देशाची विपणन व्यवस्थेत आमूलाग्र बदल करणारी आहे, असेही ते म्हणाले.