सार्वजनिक क्षेत्रातील कॅनरा बँकेचे साहसी भांडवल क्षेत्रातील अंग असलेल्या कॅनबँक व्हेंचर कॅपिटल फंडाने आणखी एका कंपनीत गुंतवणुकीची बुधवारी घोषणा केली. वैज्ञानिक संशोधनात कार्यरत आणि सुमारे १५० तज्ज्ञ शास्त्रज्ञांचा चमू सेवेत असलेल्या बायोनीड्स इंडिया प्रा. लि. या कंपनीत २५ कोटी रुपयांच्या गुंतवणुकीतून कॅनबँक व्हेंचरने आंशिक भांडवली हिस्सा मिळविला आहे.
आपल्या पाचव्या इमर्जिग इंडिया ग्रोथ फंडाच्या गंगाजळीतून ही गुंतवणूक केली गेली असल्याचे कॅनबँक व्हेंचरचे व्यवस्थापकीय संचालक एस. थिरूवाडी यांनी सांगितले. भारतीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावरील अग्रणी औषधी, जैवतंत्रज्ञान, कृषीरसायने, वैद्यक उपकरणे, पोषण आहार, सौंदर्य प्रसाधने आणि औद्योगिक वापराच्या रसायन निर्मिती कंपन्यांना बायोनीड्सद्वारे संशोधन व विकास सेवा पुरविली जाते.
या गुंतवणुकीतून बंगळुरू येथील जीवशाळा व प्रयोग केंद्राचा विस्तार कंपनीकडून साधला जाणार आहे.