सर्वात जुन्या भांडवली बाजाराच्या माध्यमातून देशाच्या अर्थविकासात सिंहाचा वाटा राखणाऱ्या दलालांनी आर्थिक राजधानीकडे पाठ वळत गुजरातमध्ये उदयास येऊ पाहणाऱ्या आंतरराष्ट्रीय वित्त-तंत्रज्ञान शहरासाठी उत्सुकता दर्शविली आहे. गांधीनगरमधील या प्रकल्पात १२० कोटी रुपयांची गुंतवणूक करत लक्षणीय व्यापारी मनोरा उभारण्याची तयारी ‘बीएसई ब्रोकर्स फोरम’ने सुरू केली आहे.
गुजरातमधील गांधीनगर येथे अद्ययावत गुजरात आंतरराष्ट्रीय वित्त-तंत्रज्ञान शहर (गिफ्ट सिटी) साकारण्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ध्येय आहे. फोरमने गुजरात शासनाबरोबर तीन लाख चौरस फूट जागेत मनोरा उभारण्याबाबतचा करार केला असून जागा हस्तांतरण प्रमाणपत्रही प्राप्त झाल्याचे फोरमचे उपाध्यक्ष आलोक चुरीवाला यांनी सांगितले. संघटनेचे ‘बॅक ऑफिस’ या नव्या जागेत असेल, असे फोरमतर्फे सांगण्यात येत असले तरी मुंबई शेअर बाजारातील व्यवहार मोठय़ा प्रमाणात या ठिकाणांहून होईल, असे कळते. मुंबई शेअर बाजाराचे कार्यालयही या जागेत भविष्यात येणार असल्याचे समजते. मुंबई शेअर बाजारातील एकूण समभाग व्यवहारांपैकी फोरमद्वारे केले जाणाऱ्या व्यवहारांचे प्रमाण ४० टक्के आहे. संघटनेचे ७४२ दलाल सदस्य आहेत.