सरत्या वर्षांत भांडवली बाजाराने अखेर वाढीव परतावा नोंदविला आहे. अर्थव्यवस्थेवर परिणाम करणाऱ्या विविध घडामोडींची दखल घेणाऱ्या या वर्षांत सेन्सेक्सने १.९४ टक्के तर निफ्टीने ३.०१ टक्के वार्षिक वाढ नोंदविली आहे. भांडवली बाजाराने २०१५ मध्ये नकारात्मक परतावा दिला होता.

वर्षभरात सेन्सेक्स ५०८.९२ अंशांची भर नोंदवीत वर्षअखेर २६,६२६.४६ वर थांबला. तर निफ्टीत वार्षिक व्यवहाराच्या अखेरच्या सत्रात ३० डिसेंबर २०१५ च्या तुलनेत २३९.४५ अंशांची वाढ नोंदविली गेली. परिणामी राष्ट्रीय शेअर बाजाराचा प्रमुख निर्देशांक शुक्रवारी ८,१८५.८० पर्यंत गेला.

३० डिसेंबर २०१६ रोजी मुंबई शेअर बाजारातील सूचिबद्ध कंपन्यांचे मूल्य १०६.२३ लाख कोटी रुपयांचे झाले. वर्षभरात त्यात ६ लाख कोटी रुपयांची भर पडली आहे.

सेन्सेक्समध्ये टीसीएस ही कंपनी सर्वाधिक, ४.६५ लाख कोटी रुपयांची मूल्य असलेली कंपनी म्हणून सर्वात वरचे स्थान पटकावणारी ठरली आहे. तिच्याबरोबर रिलायन्स इंडस्ट्रीज (३.५० लाख कोटी रुपये), एचडीएफसी बँक (३.०७ लाख कोटी रुपये), आयटीसी (२.९२ लाख कोटी रुपये) व ओएनजीसी (२.४५ लाख कोटी रुपये) या पहिल्या पाच कंपन्यांमध्ये राहिल्या आहेत.

२०१६ मधील अखेरचे व्यवहार शुक्रवारी संपुष्टात आले. २०१६ वर्षांचा अखेरचा दिवस शनिवारी येत असल्याने या दिवशी भांडवली बाजारात व्यवहार होणार नाहीत. परिणामी शुक्रवार हाच बाजाराचा २०१६ मधील अखेरचा ठरला.

२०१६ मध्ये ८ सप्टेंबर रोजी सेन्सेक्सने २९,०७७.२८ हा या वर्षांतील सर्वोच्च तर २९ फेब्रुवारीला २२,४९४.६१ असा वर्षांचा नीचांक नोंदविला आहे. वर्षभरात निफ्टी ७ सप्टेंबर रोजी ८,९६८.७० या वरच्या तर २९ फेब्रुवारीला ६,८२५.८० या किमान स्तरावर राहिला आहे.

२०१५ मध्ये नकारात्मक परतावा देणाऱ्या सेन्सेक्सने गेल्या १० वर्षांत तीन वेळा सुमार कामगिरी बजाविली आहे. २०१६ मधील त्याची २ टक्क्यांपर्यंतची वाढ ही दशकातील सर्वोत्तम गणली गेली आहे.

गुरुवारच्या तुलनेत सेन्सेक्समध्ये सप्ताहअखेर २६०.३१ अंशांनी वाढला. तर निफ्टीत ८२.२० अंश भर पडली. दोन्ही प्रमुख निर्देशांकांनी गेल्या पंधरवडय़ातील नवा उच्चांक शुक्रवारी नोंदविला गेला. साप्ताहिक तुलनेत मुंबई निर्देशांक ५८५.७६ अंश (२.२४%) तर निफ्टी २००.०५ अंश (२.५०%) वाढ राखणारा ठरला आहे.