सप्ताहअखेरच्या व्यवहारात भांडवली बाजारात समभाग विक्री दबाव कमालीचा वाढला. सत्रअखेरीसही २८ हजाराच्या खाली राहिलेला सेन्सेक्स व्यवहारात २७.५०० पर्यंत तळात होतो. तर १७० अंश घसरणीने निफ्टी ८ हजारावर येऊन ठेपला.

दोन्ही प्रमुख निर्देशांकात आठवडय़ाच्या शेवटच्या सत्रात गुरुवारच्या तुलनेत प्रत्येकी २ टक्क्यांनी अधिक घसरण झाली.

चालू एकूण सप्ताहात मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक – सेन्सेक्समध्ये २,२२५ अंकांची तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक -निफ्टीत ५७७ अंकांची घसरण नोंदली गेली आहे.

करोना संकटाच्या अर्थफटक्यामुळे पतमानांकन संस्थांनी बँकांबाबत चिंता व्यक्त केल्याने भांडवली बाजारात सूचिबद्ध या क्षेत्रातील समभागांच्या मूल्यात शुक्रवारी कमालीची घसरण अनुभवली गेली.

मूडिज या अमेरिकी वित्तसंस्थेने बुधवारपासून सुरू झालेल्या भारताच्या आर्थिक वर्षांच्या विकास दराबाबततचा अंदाजही घटविला आहे.