दुसऱ्या कसोटीनंतर कर्णधार विराट कोहलीचे विश्लेषण

लंडन : भारतीय फलंदाजांच्या मानसिकतेमध्ये समस्या आहे, फलंदाजीच्या तंत्रात नव्हे, असे मत भारताचा कर्णधार विराट कोहलीने व्यक्त केले. इंग्लंडविरुद्धची कसोटी मालिका वाचवण्यासाठी सोपे धोरण अवलंबण्याची आवश्यकता आहे, असे आवाहन कोहलीने सहकारी फलंदाजांना केले आहे.

लॉर्ड्सच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारताने अनुक्रमे १०७ आणि १३० धावा केल्या. या अपुऱ्या धावसंख्यांमुळे भारताला रविवारी एक डाव आणि १५९ धावांनी कसोटी गमवावी लागली. पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत भारत आता ०-२ असा पिछाडीवर आहे. तिसरा सामना १८ ऑगस्टपासून नॉटिंगहॅमला सुरू होणार आहे. दुसऱ्या कसोटीनंतर भारताच्या कामगिरीचे विश्लेषण करताना कोहली म्हणाला, ‘‘भारतीय फलंदाजांमध्ये काही तांत्रिक कमतरता आहे, असे मला वाटत नाही. फलंदाजाच्या डोक्यात स्पष्टता असावी आणि योजनानुरूप स्वत:च्या जबाबदारीची जाणीव असावी. मग खेळपट्टी कोणतीही असली किंवा चेंडू कसाही वळला तरी तुम्ही हिमतीने प्रतिकार करू शकाल.’’

‘‘माझ्या डोक्यात अनेक विचारांचे थमान असेल. मनात तीन-चार पद्धतीने विचार चालू असतात, हे तर नक्की. चेंडू असा किंवा तसा वळेल, याविषयी चिंता असेल. त्यामुळे खचून जाण्याची मुळीच आवश्यकता नसते. खेळाकडे सोप्या पद्धतीने पाहा, हा क्रिकेटमधील मातब्बर मंडळींचा सल्ला अशा वेळी उपयोगात आणावा. तुम्ही परिस्थितीशी झुंजण्याची तयारीच नीट केली नसेल, तर इथे येऊन त्याविषयी चिंता प्रकट करण्याची अजिबात गरज नाही. मनातील भीतीच्या या राक्षसावर मात करण्याची नितांत आवश्यकता असते,’’ असे कोहलीने सांगितले.

तो पुढे म्हणाला, ‘‘देशातील कोणतीही स्थिती सोपी असेल किंवा कठीण असेल. खेळपट्टी, वातावरण हे घटक महत्त्वाचे असतात. भारतासाठी ते अनुकूल नव्हते. ढगाळ वातावरणात भारताला फलंदाजी करावी लागली, तर लख्ख सूर्यप्रकाशात तिसऱ्या दिवशी इंग्लंडने फलंदाजी केली.’’

गोलंदाजीतील सातत्य टिकवता आले नाही!

गोलंदाजांनी पहिल्या कसोटीत उत्तम कामगिरी केली, परंतु लॉर्ड्सवर कामगिरीतील सातत्य टिकवता आले नाही, अशी कबुली कोहलीने दिली. ‘‘नाणेफेक किंवा हवामान हे कुणाच्याही नियंत्रणात नसते. दुसऱ्या कसोटीत आम्ही चांगले क्रिकेट खेळू शकलो नाही. मालिकेत सुरुवातीला गोलंदाजांनी अप्रतिम कामगिरी बजावली. परंतु त्यातील सातत्य टिकवता आले नाही. आम्ही फलंदाजी आणि गोलंदाजी या दोन्ही विभागांमध्ये यापेक्षा अधिक चांगली कामगिरी करू शकलो असतो,’’ असे कोहलीने सांगितले.

तिसऱ्या कसोटीचा सकारात्मक विचार करू!

बर्मिगहॅम आणि लॉर्ड्स या दोन्ही कसोटी सामन्यांमध्ये भारताचे सलामीवीर अपयशी ठरले होते. कोहली वगळता भारताच्या मधल्या फळीलाही अपेक्षेप्रमाणे न्याय देता आला नाही. या अपयशाबाबत विशिष्ट कोणालाही जबाबदार धरणे योग्य ठरणार नाही, असे कोहलीने सांगितले. ‘‘संपूर्ण सामन्यांचा विचार केल्यास फलंदाजीमध्ये भारताची चांगली कामगिरी झालेली नाही. त्यामुळे आघाडीची फळी किंवा मधली फळी हे अपयशास जबाबदार धरणे योग्य ठरणार नाही. त्यापेक्षा पुढील सामन्याचा सकारात्मक पद्धतीने विचार करणे अधिक योग्य ठरेल,’’ असे कोहलीने सांगितले.

कोहलीने कसोटी क्रमवारीतील अग्रस्थान गमावले

दुबई : भारताचा कर्णधार विराट कोहलीने आयसीसी कसोटी क्रमवारीमधील फलंदाजांच्या यादीतील अग्रस्थान गमावले आहे. इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यातील खराब कामगिरीमुळे तो आता दुसऱ्या स्थानावर फेकला गेला आहे. चेंडू फेरफारप्रकरणी एक वर्ष बंदीची शिक्षा भोगणारा ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार स्टीव्ह स्मिथ पुन्हा अव्वल स्थानावर पोहोचला आहे. कोहलीने दुसऱ्या कसोटीत अनुक्रमे २३ आणि १७ धावा काढताना भारताला अनुक्रमे १०७ आणि १३० अशी धावसंख्या उभारून दिली होती. लॉर्ड्सवरील या कसोटीत भारताने एक डाव आणि १५९ धावांनी पराभव पत्करला होता.

दुखापतीमुळे पाचव्या स्थानावर फलंदाजी

पाठीच्या दुखापतीमुळे दुसऱ्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या डावात कोहली पाचव्या क्रमांकावर फलंदाजीला उतरला. पुढील सामन्यापर्यंत दुखापतीतून सावरेन, असा आशावाद त्याने प्रकट केला. ‘‘पाठीची समस्या ही आव्हानात्मक ठरते. दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर उत्तरार्धात या दुखापतीने मला त्रस्त केले. त्यामुळे मला एकमेव ट्वेन्टी-२० सामना गमवावा लागला होता. आता पुढील कसोटीसाठी माझ्याकडे पाच दिवसांचा अवधी आहे,’’ असे कोहली म्हणाला.