* विक्रीत एसयूव्ही मात्र वरचढ
* केवळ महिंद्रच्या विक्रीत वाढ
ग्राहकांमध्ये खरेदीसाठी पारंपरिकरीत्या शुभ मानल्या गेलेल्या पाडव्याच्या पूर्वसंध्येलाच देशातील कार-विक्रीच्या सरलेल्या तपातील सर्वात खराब कामगिरीचे चित्र पुढे आले आहे. जसे अंदाज वर्तविले जात होते त्यानुसार कार-विक्रीने गेल्या १२ वर्षांत प्रथमच घसरणीची नोंद केली आहे. मात्र सरलेल्या आर्थिक वर्षांत एसयूव्ही-एमयूव्ही या वाहनांच्या विक्रीने बाजी मारली असून, तब्बल साडेपाच लाखांच्या विक्रीचा आकडा गाठला आहे. कारपेक्षा या नव्या बडय़ा आकाराच्या पण अधिक इंधन खाणाऱ्या प्रवासी वाहनाकडे ग्राहकांचा पसंती कल स्पष्टपणे झुकलेला दिसून येतो.
आर्थिक वर्ष २०१२-१३ मध्ये देशांतर्गत बाजारपेठेत १८ लाख ९५ हजार कारची विक्री झाली, जी आधीच्या वर्षांच्या तुलनेत तब्बल ६.७ टक्क्यांनी घसरली आहे. २००१ सालानंतर वाहन विक्रीचा टक्का पहिल्यांदाच घसरलेला दिसला आहे. २००१ आर्थिक वर्षांत कारच्या विक्रीत आधीच्या वर्षांच्या तुलनेत ७.७ टक्क्यांची घसरण झाली होती. तथापि स्पोर्ट्स युटिलिटी व्हेइकल्स (एसयूव्ही) आणि क्रॉसओव्हर्स या प्रवासी वाहन प्रकारांनी सध्याच्या मलूलतेत बाजी मारली आहे. एप्रिल २०१२ ते मार्च २०१३ या कालावधीत या वाहनांनी पाच लाख ५३ हजार असा विक्रीचा आकडा गाठला आहे. अर्थात याचे प्रत्यंतर फायदा महिंद्र अ‍ॅण्ड महिंद्र या कंपनीच्या वाढ दर्शविणाऱ्या विक्री कामगिरीत उमटलेले स्पष्टपणे दिसत आहे. महिंद्रच्या वार्षिक विक्री भरीव २७ टक्क्यांनी वाढली आहे. महिंद्रशी सवतासुभा घेऊन स्वतंत्र वाटचाल करणाऱ्या फ्रेंच वाहननिर्मात्या रेनॉच्या किफायती ‘डस्टर’ या एसयूव्हीच्या विक्रीने अवघ्या आठ महिन्यांत ४० हजारांचा आकडा पार केला आहे. मारुती सुझुकी, टाटा मोटर्स, ह्य़ुंदाई या अन्य सर्व कार विक्रेत्या कंपन्यांची देशांतर्गत विक्री सरलेल्या वर्षांत कमालीची घटली आहे.
देशाच्या आर्थिक हालहवालाचे प्रत्यक्ष दिशादर्शक असलेल्या अवजड वाणिज्य वाहने आणि बसेसच्या विक्रीत तर आधीच्या वर्षांच्या तुलनेत तब्बल २३ टक्क्यांनी घट झाली असल्याचे ‘द सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाइल मॅन्युफॅक्चर्स (सियाम)’च्या आकडेवारीतून स्पष्ट होते.
वाहन उत्पादकांची  कामगिरी
                   देशांतर्गत/ निर्यात विक्री    
मारुती सुझूकी …..   – ४.७८%
२०१३      १०७,८९०/ १२,०४७      
२०१२       ११२,७२४/ १३,२२८
टाटा मोटर्स ……..   – २७.६%
२०१३     ६९,१६०/ ३,५५२    
२०१२     ९५,०४७/ ५,३६७
ह्युंडाई मोटर्स …….  – ४.७१%
२०१३     ३३,८५८/ २२,५७९    
२०१२     ३९,१२२/२०,१०७
महिंद्र अ‍ॅण्ड महिंद्र…  +१०.६%
२०१३     ४९,२२५/ २,६७९    
२०१२     ४४,२६८/ २,६५९

आगामी वर्षांत ५ ते ७% वाढीची आशा : सियाम
सरलेल्या २०१३ या सर्वागाने खडतर आर्थिक वर्षांनंतर, आगामी २०१४ वर्षांबाबत मात्र ‘द सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाइल मॅन्युफॅक्चर्स (सियाम)’ या वाहन उद्योगाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या संघटनेने आशावादी सूर लावला आहे. अर्थचक्र जसा वेग पकडेल तसे चालू आर्थिक वर्षांत कार आणि एसयूव्हीच्या विक्रीला गती येईल आणि किमान ५ ते ७ टक्के वाढीची अपेक्षा करता येईल, असा सियामचा कयास आहे.

वाहने हे थेट देशाच्या अर्थकारणाच्या नाडीशी जुळलेली असल्याने, सरकारचे आर्थिक उभारीच्या दिशेने सुरू असलेल्या प्रयत्नांचे थेट प्रतिबिंब वाहनांच्या मागणीत उमटलेले पाहता येईल. यातून येणाऱ्या काही महिन्यांत मागणी आणि विक्रीतही लक्षणीय सुधारणा पाहता येईल.
एस. शांडिल्य अध्यक्ष ‘सियाम’
निर्यात वाढली – २.६३%
२३०,२८२ (२०१३)
२२४,३८८ (२०१२)
उत्पादन मात्र घटले – -८.७०%
१,६८५,३५५
१,८४५,८६८