आलिशान महागडय़ा एसयूव्हींना भविष्यात दमदार मागणीचे वेध

मुंबई : सरलेल्या २०१८-१९ वित्त वर्षांत देशांतर्गत प्रवासी वाहनांची विक्रीत वाढीची कामगिरी गेल्या पाच वर्षांतील नीचांक नोंदविणारी राहिली असताना, आलिशान मोटारींमधील अग्रणी बीएमडब्ल्यूने मात्र १३ टक्क्य़ांच्या दमदार वढीसह ११,१०५ कार याच काळात विकल्या आहेत. आलिशान महागडय़ा एसयूव्हींसाठी भारत ही सर्वात आकर्षक बाजारपेठ असून, चालू वर्षांतही विक्रीत दुहेरी अंकात वाढीची कामगिरी कायम राखण्याचा बीएमडब्ल्यूचा आशावाद आहे.

जर्मनीची आलिशान कार निर्माता समूहाचे अंग असलेल्या बीएमडब्ल्यू ग्रुप इंडियाचे अध्यक्ष डॉ. हान्स क्रिस्टियन बार्टेल यांनी मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकर यांच्या उपस्थितीत जगभरात सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या ‘बीएमडब्ल्यू एक्स ५’ या एसयूव्हीचे गुरुवारी मुंबईत अनावरण केले. २० वर्षांपूर्वी सर्वप्रथम बनविल्या गेलेल्या या वाहनाची ही चौथी अद्ययावत आवृत्ती असून, जगभरात तिच्या विक्रीने २० कोटींचा टप्पा नुकताच ओलांडला आहे. आलिशान एसयूव्ही श्रेणीतील मर्सिडिझ बेन्झ जीएलई, व्होल्वो एक्ससी ९०, रेंज रोव्हर व्हेलार, पोर्शे केने आणि ऑडी क्यू ७ यांच्याशी तिची स्पर्धा असेल. बीएमडब्ल्यू एक्स ५ तीन वेगवेगळ्या प्रकारात उपलब्ध असून, डिझेल इंधनावरील वाहनाची किमत ७२.९ लाखांपासून पुढे सुरू होते.

भारतातील विक्रीतील चढत्या आलेखाबद्दल आशावादी सूर व्यक्त करताना, डॉ. हान्स यांनी २०१८-१९ मधील वाढलेल्या विक्रीत स्थानिक स्तरावर निर्मिती सुरू केल्या गेलेल्या एक्स ३ आणि एक्स ४ या वाहनांना मिळविलेली मागणीचे मोठे योगदान असल्याचे सांगितले. बीएमडब्ल्यूने जानेवारी ते मार्च २०१९ या तिमाहीत आजवरची सर्वाधिक २,९८२ वाहनांची विक्री नोंदविली. जी वर्षांगणिक १९ टक्के इतकी वाढली आहे. तर त्याच तिमाहीत देशांतर्गत एकूण प्रवासी कारच्या विक्रीचा वाढीचा वेग अवघा ५.३२ टक्के इतका होता. तिच्या ‘मोटोरॅड’ या प्रीमियम लक्झरी दुचाकीने या तिमाही ५९७ बाइकच्या विक्रीचा उच्चांक नोंदविला आहे.