बहुपयोगी वाहनांना (एसयूव्ही) असलेल्या वाढत्या मागणीने अखेर प्रवासी कार विक्रीलाही मागे टाकले. बहुपयोगी गटातील वाहनांची विक्री मेमध्ये वाढली असून तुलनेने प्रवासी कारची विक्री किरकोळ घसरली आहे. मे २०१५ मधील १,६०,३७१ विक्रीच्या तुलनेत यंदाच्या मे महिन्यांत कार विक्री १,५८,९९६ वर घसरली आहे.
वाहन उत्पादकांची संघटना असलेल्या सिआमने गुरुवारी देशातील वाहन विक्रीचे आकडे जाहीर केले. यानुसार गेल्या महिन्यात प्रवासी कार विक्रीने नकारात्मक प्रवास नोंदविला आहे. या गटातील वाहनांकडून खरेदीदार बहुपयोगी तसेच नव्या श्रेणीतील कॉम्पॅक्ट एसयूव्ही गटाकडे वळल्याचे संघटनेचे महासंचालक विष्णू माथूर यांनीही मान्य केले आहे. प्रवासी कार विक्रीला यंदा मिळालेला कमी प्रतिसाद हे विशेषत: ग्रामीण भागातील खरेदीदारांनी फिरविलेली पाठ यामुळे असल्याचेही माथूर म्हणाले.
गेल्या काही महिन्यांमध्ये बहुपयोगी तसेच कॉम्पॅक्ट एसयूव्ही गटातील नव्या वाहनांची गर्दीच बाजारात झाली आहे. यामध्ये ह्य़ुंदाईच्या क्रेटा, मारुती सुझुकीच्या ब्रेझा, महिंद्र अ‍ॅन्ड महिंद्रच्या टीयूव्ही३०० व केयूव्ही१०० लाख अधिक प्रतिसाद मिळत आहे. याच गटातील काही वर्षांपूर्वी बाजारात आलेल्या फोर्डची इकोस्पोर्ट्स, रेनोची डस्टरचीही घोडदौड सुरू आहे.
एसयूव्ही गटात अव्वल  महिंद्रच्या प्रवासी वाहन विक्रीत ८.२७ टक्के वाढ होत ती यंदाच्या मेमध्ये १९,६३५ झाली आहे. बहुपयोगी वाहनांची विक्री मेमध्ये तब्बल ३५.८८ टक्क्य़ांनी वाढून वर्षभरापूर्वीच्या ४३,२६९ वरून यंदा ५८,७९३ वर गेली आहे. मेमध्ये मारुती सुझुकी (+२.५९ टक्के), ह्य़ुंदाई मोटर (-८.२१ टक्के), होंडा कार्स इंडिया (-३८.८९ टक्के), टाटा मोटर्स (-१५.१३ टक्के) असा प्रवास कार विक्रीबाबत नोंदला गेला आहे.
वाणिज्य वाहनांची विक्री मेमध्ये ५७,०८९, म्हणजे १६.८९ टक्क्य़ांनी वाढली आहे. तर दुचाकी विक्री ९.७५ टक्क्य़ांनी वाढत १५,१५,५५६ वर गेली आहे. यामध्ये मोटरसायकलची विक्री ३.३४ टक्क्य़ांनी वाढत ९,८५,१५८ झाली आहे.
रोखीने कार खरेदी? एक टक्का कर लागणार
१० लाख रुपयांवरील वाहन खरेदीवर एक टक्का कर लागू झाल्यानंतर आता या रकमेपर्यंतच्या वाहनांच्या खरेदीचे व्यवहार रोखीने केल्यासही एक टक्का कर आकारला जाणार आहे. रोख, धनादेश अथवा डिमांड ड्राफ्टमार्फत कशीही १० लाख रुपयांवरील वाहन खरेदी केल्यास एक टक्का कर लागू असेल. मात्र दोन ते १० लाख रुपयांपर्यंतची वाहने रोकड देऊन खरेदी केल्यास त्यावरही एक टक्का कर आकारण्याचे केंद्रीय प्रत्यक्ष मंडळाने नव्या परिपत्रकात स्पष्ट करण्यात आले आहे.