नोव्हेंबरमध्ये बजाज, सुझुकीच्या दुचाकींनाही उमदी मागणी

मारुती,  ह्य़ुंदाई, टोयोटा, महिंद्रसह बजाज ऑटो, सुझुकी मोटरसायकलच्या विक्रीत गेल्या महिन्यात वाढ नोंदली गेली आहे. १.५४ लाख पुढे जाताना मारुती सुझुकीने नोव्हेंबरमध्ये सर्वाधिक मासिक विक्रीचा विक्रम गाठला आहे. तर टोयोटा, फोर्डसह अनेक कंपन्यांना दुहेरी अंकातील वाहनवृद्धी राखता आली आहे.

वाहन विक्रीत अग्रेसर असलेल्या मारुती सुझुकीने १४ टक्के वाढीसह गेल्या महिन्यात १,५४,६०० प्रवासी वाहने विकली आहेत. यामध्ये देशांतर्गत वाहनांची संख्या १,४५,३०० आहे. कंपनीची निर्यात किरकोळ वाढून ९,३०० झाली आहे.

अल्टो, व्हॅगनआरसारख्या लहान गटातील वाहनांमध्ये मात्र किरकोळ घसरण झाली आहे. तर स्विफ्ट, एस्टाईलो, डिझायर, बलेनोची विक्री ३२.४ टक्क्यांनी वाढली आहे. कंपनीच्या सेदान तसेच व्हॅनची विक्रीही यंदा वाढली आहे.

देशातील दुसऱ्या क्रमांकाची व निर्यातीत आघाडीवर असलेल्या ह्य़ुंदाई मोटर इंडिया लिमिटेडने नोव्हेंबरमध्ये ४४,००८ वाहने विकली आहेत. वर्षभरापूर्वीच्या याच कालावधीतील ४०,०१६ वाहनांच्या तुलनेत यंदा त्यात १० टक्के वाढ झाली आहे.

एसयूव्ही श्रेणीतील मातब्बर महिंद्र अँड महिंद्रच्या वाहन विक्रीत नोव्हेंबरमध्ये १८ टक्के वाढ झाली आहे. कंपनीची ३८,५७० वाहने गेल्या महिन्यात विकली गेली. कंपनीच्या देशांतर्गत बाजारपेठेतील विक्रीत २१ टक्के वाढ झाली आहे, तर निर्यातीत ६ टक्के घसरण झाली आहे. कंपनीची व्यापारी वाहने २२ टक्क्यांनी अधिक विकली गेली आहेत.

टोयोटा किर्लोस्कर मोटर कंपनीच्या वाहन विक्रीत १३ टक्के वाढ राखली गेली आहे. कंपनीच्या १२,७३४ वाहनांची विक्री गेल्या महिन्यात झाली. तर फोर्ड इंडियाच्या विक्रीत २९ टक्के वाढ झाली आहे. कंपनीच्या २७,०१९ वाहनांची विक्री यंदाच्या नोव्हेंबरमध्ये झाली. कंपनीची देशांतर्गत बाजारपेठेत ७,७७७ वाहने विकली गेली. कंपनीची निर्यात ३६.१९ टक्क्यांनी वाढली आहे.

मोटरसायकल विक्रीतील अग्रेसर बजाज ऑटोने एकूण विक्रीत नोव्हेंबरमध्ये २१ टक्के वाढ नोंदविली आहे. कंपनीच्या ३,२६,४५८ वाहनांची विक्री गेल्या महिन्यात झाली. यामध्ये मोटरसायकल विक्री ११ टक्क्यांनी वाढून २,६३,९७० झाली आहे. तर व्यापारी वाहनांमध्ये सुमारे ९४ टक्के झेप नोंदली गेली आहे. कंपनीची निर्यात काही प्रमाणात वाढून १,४६,६२३ वाहने झाली आहे.

सुझुकी मोटरसायकलने गेल्या महिन्यात ३७.२ टक्के वाढीसह ४९,५३५ दुचाकी विकल्या आहेत. पैकी देशांतर्गत ४२,७२२ वाहने विकली आहेत. तर ६,८१३ वाहनांची निर्यात झाली आहे. बुलेटकरिता लोकप्रिय असलेल्या रॉयल एनफील्डची एकूण विक्री २२ टक्क्यांनी उंचावत ७०,१२६ झाली आहे. कंपनीने नोव्हेंबर २०१६ मध्ये ५७,३१३ वाहने विकली आहेत. कंपनीच्या निर्यातीत ६० टक्क्यांची झेप नोंदली गेली आहे.

नवीन वर्ष किंमतवाढीचे!

आगामी २०१८ सालाच्या प्रारंभापासून अनेक वाहन कंपन्यांनी किंमतवाढ जाहीर केली आहे. इसुझु मोटर इंडियाने तिच्या विविध गटातील वाहनांच्या किमती १ जानेवारीपासून एक लाख रुपयांपर्यंत वाढविण्याची घोषणा केली आहे. टक्केवारीत ही वाढ ३ ते ४ टक्के असेल, असे स्पष्ट करण्यात आले आहे. गेल्याच आठवडय़ात स्कोडा ऑटो इंडियाने वाहनांच्या किमती २ ते ३ टक्क्यांनी वाढविण्यात येत असल्याचे स्पष्ट केले होते.