नवी दिल्ली : दिवाळीचा महिना व जोडीला नव्याने दाखल झालेली वाहने यामुळे नोव्हेंबरमध्ये वाहन विक्रीत तेजी दिसून आली. प्रवासी वाहनांमध्ये निम्मा हिस्सा राखणाऱ्या मारुती सुझुकीच्या विक्रीत नोव्हेंबरमध्ये १.७ टक्के वाढ होऊन १.५३ लाख वाहने विकली गेली आहेत.

मारुती सुझुकी, महिंद्र अ‍ॅण्ड महिंद्र यांच्या वाहनांना अपेक्षेप्रमाणे चांगली मागणी राहिली. मात्र प्रस्थापितांबरोबरच नवागत एमजी मोटर, किया मोटर्स यांनीही नोव्हेंबरमध्ये विक्रीत लक्षणीय वाढ साधली आहे.

मारुतीची देशांतर्गत वाहन विक्री १.४४ लाखांपुढे गेली आहे. तर निर्यातीत २९.७ टक्के वाढ झाली आहे. स्पर्धक ह्य़ुंदाई मोटर इंडियाला मात्र यंदा विक्रीत दोन टक्के घसरणीला सामोरे जावे लागले. वर्षभरापूर्वीच्या ६०,५०० वाहनांच्या तुलनेत नोव्हेंबर २०२० मध्ये ह्य़ुंदाईच्या प्रवासी वाहनांची विक्री ५९,२०० इतकी झाली आहे. महिंद्र अ‍ॅण्ड महिंद्रने ३.६२ टक्के वाढीसह ४२,७३१ वाहन विक्री नोंदविली आहे. तर कंपनीच्या निर्यातीत ३८ टक्के घसरण झाली आहे.

किया मोटर्सने विक्रीतील ५० टक्के वाढ नोंदविताना गेल्या महिन्यात २१,०२२ प्रवासी वाहनांची विक्री केली आहे. कंपनीच्या सेल्टोजची ९,२०५ आणि सोनेटची ११,४१७ विक्री झाली आहे. तर एमजी मोटर इंडियाने सर्वोत्तम विक्री नोंदविताना नोव्हेंबरमध्ये ४,१६३ वाहने विकली. वार्षिक तुलनेत त्यात २८.५ टक्के वाढ झाली आहे.

वाणिज्य वापराच्या वाहन निर्मितीतील अशोक लेलँड व व्हीई कमर्शिअल व्हेईकल्सने अनुक्रमे ५ टक्के व ३ टक्के वाढ नोंदविली आहे. तर दुचाकी निर्मिती क्षेत्रातील बजाज ऑटोने ५ टक्के, टीव्हीएस मोटर कंपनीने २१ टक्के व यामाहा मोटर इंडियाने ३५ टक्के वाढ नोंदविली आहे.

टाटा मोटर्स भरधाव

नोव्हेंबरमध्ये २१,६०० वाहने विकून टाटा मोटर्सने गेल्या वर्षांच्या तुलनेत दुपटीहून अधिक (१०८ टक्के वाढ) विक्रीत वाढ केली आहे. आधीच्या महिन्यांतील म्हणजे ऑक्टोबरच्या २३,६०० विक्रीच्या तुलनेत यंदा विक्री काहीशी घटली आहे. तरीही भारताच्या प्रवासी वाहन बाजारपेठेत ७.५ टक्के हिश्शासह कंपनीने विक्री आकडेवारीच्या तुलनेत नोव्हेंबरमध्ये मारुती सुझुकी, ह्य़ुंदाई या पाठोपाठ तिसरे स्थान पटकावले आहे.