देशभरात अनेक भागांत एटीएममध्ये खडखडाट आणि रोखीच्या चणचणीने जनसामान्यांपुढे अडचणीची स्थिती निर्माण केली असताना, देशातील सर्वात मोठी बँक असलेल्या स्टेट बँकेने गेल्या दिवसभरात एटीएममध्ये पुरेशा नोटा राखल्या गेल्या असून, परिस्थिती सुधारली असल्याचा दावा केला आहे.

स्टेट बँकेसह, पंजाब नॅशनल बँक, कॅनरा बँक आणि अ‍ॅक्सिस या अन्य बडय़ा बँकांनाही चलनटंचाईची स्थिती मोजक्या भागापुरतीच मर्यादित असल्याचे सूचित केले आहे.

गेल्या काही दिवसांमध्ये देशभरात अनेक भागांत रोख नोटांची मागणी अकस्मात वाढली आणि त्या परिणामी उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि निवडणुका तोंडावर असलेल्या कर्नाटकसह काही राज्यांमध्ये नोटाबंदीच्या काळाची आठवण करून देणारी चलनटंचाई स्थिती निर्माण झाल्याची कबुली केंद्रीय अर्थमंत्रालयातील वित्तीय सेवा विभागाचे सचिव राजीव कुमार गर्ग यांनी दिली. चलनटंचाईच्या स्थितीशी सामना म्हणून ५०० रुपये मूल्याच्या नोटांची छपाई पाचपटीने वाढविली असल्याचे त्यांनी सांगितले.

तथापि, गेल्या २४ तासांत प्रयत्नपूर्वक टंचाईग्रस्त भागात रोख उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करण्यात आला आणि रोखीसंबंधी परिस्थिती लवकरच पूर्वपदावर येईल, असे स्टेट बँकेचे सह-व्यवस्थापकीय संचालक नीरज व्यास यांनी स्पष्ट केले.

बँकेकडून सातत्याने परिस्थितीचा आढावा घेतला जात असून, एटीएममध्ये पुरेशा नोटांचा पुरवठय़ाचे प्रयत्न सुरू आहे, अशी पुस्ती त्यांनी जोडली.

एटीएममध्ये नोटांच्या उपलब्धतेचे ९२ टक्के प्रमाण हे सामान्य मानले जाते, काल (मंगळवापर्यंत) हे प्रमाण ८५ टक्क्यांपर्यंत खाली घसरल्याचे आढळून आले. परंतु नंतरच्या दिवसभरात पुरवठा वाढविण्याच्या प्रयत्नामुळे हे प्रमाण पुन्हा वाढून ९० टक्क्यांपल्याड गेले आहे, असे स्टेट बँकेचे म्हणणे आहे.