स्टेट बँकेच्या संशोधन टिपणातून नोटाटंचाईची उकल

चलनात असलेल्या नोटांचा पुरवठा नोटाबंदीपूर्व पातळीपेक्षा अधिक असताना आणि चलन गतिमानता अर्थात जनसामान्यांकडून नोटांची मागणी प्रत्यक्षात घसरली असताना, देशात अनेक भागांत नोटांच्या तुटवडय़ाची स्थिती असणे हे ‘तर्क विसंगत’ भासत असल्याची टिप्पणी बँकिंग अग्रणी स्टेट बँकेच्या संशोधन अहवालाने केली आहे. एटीएममधून रोख काढण्याचे प्रमाण लक्षणीय वाढणे हेच केवळ या स्थितीबाबत कारण आढळून येत असल्याचा अहवालाचा शेरा आहे.

अर्थव्यवस्थेत चलनात असलेल्या नोटांचे मूल्य मार्च २०१८ अखेर १८.२८ लाख कोटी रुपयांवर गेले आहे. निश्चलनीकरणापूर्वी म्हणजे नोव्हेंबर २०१६ आधी असलेल्या १७.९८ लाख कोटी रुपयांपेक्षा ते अधिक आहे. अशा स्थितीत देशाच्या काही भागात चलनटंचाईचे चित्र उभे राहणे हे तर्कदृष्टय़ा न पटणारे आणि विचित्र भासते, असे मत स्टेट बँकेचे मुख्य अर्थतज्ज्ञ सौम्य कांती घोष यांनी व्यक्त केले.

दरवर्षी आर्थिक वर्षांच्या उत्तरार्धात, म्हणजे सप्टेंबरपासून सणासुदीचे दिवस आणि ग्रामीण भागात सुगीच्या हंगामामुळे नोटांची मागणी पूर्वार्धापेक्षा अधिक असते. तथापि २०१८ सालात नोटांच्या मागणीतील ही वाढ खूपच अधिक आहे.

एटीएममधून रोख काढून घेण्याचे प्रमाण या काळात १२.२ टक्क्यांवर आहे. जे आर्थिक वर्ष २०१२ ते २०१६ या आधीच्या पाच वर्षांच्या ८.२ टक्के सरासरीपेक्षा खूपच मोठे आहे. तथापि यातून अनेक ठिकाणी नोटाटंचाई स्थिती निर्माण करणारा परिणाम साधला जाईल, असे पटण्यासारखे नसल्याची पुस्तीही डॉ. घोष यांनी जोडली आहे.

दोन हजारांच्या नोटांच्या साठेबाजीत वाढीचा संशय

चालू आर्थिक वर्षांच्या उत्तरार्धात जनसामान्यांकडून नोटांच्या मागणीचा कल घसरता असल्याचे स्पष्टपणे दिसून येतो. जरी राज्यवार अथवा प्रदेशागणिक नोटांच्या मागणीच्या प्रमाणाचे साकल्याने वेध घेणे अवघड असल्याचे स्टेट बँकेच्या शाखांतर्गत मागणीनुसार, बिहार, गुजरात आणि दक्षिणेकडील राज्यांमधून नोटांची मागणी ही राष्ट्रीय सरासरीपेक्षाही खूप खाली असल्याचे आढळते. त्यामुळे चलनटंचाईमागे सर्वोच्च मूल्य असलेल्या २००० रुपयांच्या नोटांचे बाजारातील चलन पुरेशा प्रमाणात होत नसावे, हे सकृद्दर्शनी कारण दिसून येते, असे डॉ. सौम्य कांती घोष यांच्या टिपणाचा दावा आहे.

दोन हजारांच्या नोटांची साठेबाजी सुरू आहे आणि साठेबाजीची ही लागण नोटांची मागणी अधिक असलेल्या राज्यांमध्ये अधिक असल्याचे त्यांनी सूचित केले आहे.