वेगाने वाढणाऱ्या ग्राहकोपयोगी वस्तू निर्मिती क्षेत्रातील केव्हिनकेअरने रागा प्रोफेशनल्स या त्वचा आणि केस निगा क्षेत्रातील श्रेणीचा विस्तार करताना मुंबईसह महाराष्ट्रात नवी उत्पादने सादर केली आहेत. नव्या भौगोलिक क्षेत्रातील प्रवेश सुकर होण्यासाठी राज्यातील विविध सलून दालनांबरोबर सहकार्याचे अनोखे विपणन करतानाच या बाजारपेठेतील १० टक्के हिस्सा काबीज करण्याचे लक्ष्य येत्या तीन वर्षांसाठी आखण्यात आले आहे.
महिन्याच्या सुरुवातीला मुंबईत झालेल्या फॅशन शोच्या निमित्ताने आघाडीच्या मॉडेल्सने कंपनीच्या नव्या उत्पादनांचे या वेळी सादरीकरण केले. व्येंकी चरण आणि ममता सिंह या त्वचातज्ज्ञांनीही या प्रसंगी उत्पादनांचे कौतुक केले.  
कंपनीची ही उत्पादने उत्तर आणि दक्षिण महाराष्ट्रातील निवडक शहरांमध्ये २०१० पासून उपलब्ध आहेत. केव्हिनकेअरच्या किरकोळ सलून उत्पादन विभागाचे व्यवस्थापक केतन टाकळकर यांनी सांगितले की, या उत्पादननिर्मिती क्षेत्रात आम्हाला इतरत्र चांगला प्रतिसाद मिळाला आहे. नव्या भौगोलिक क्षेत्रात प्रवेश करताना नव्या क्लृप्तीसह दाखल होणे गरजेचे होते. त्यासाठीच मुंबईसह महाराष्ट्रात या क्षेत्रातील उत्पादने सादर करताना पुणे, नागपूर, औरंगाबाद, कोल्हापूर यांसारख्या प्रमुख शहरातील तीन हजारांहून अधिक सलूनबरोबर सहकार्य करण्यात आले आहे. केस रंग, त्वचा निगा आणि बॉडी मसाज या संघटित क्षेत्रांतील उत्पादनांची भारतीय बाजारपेठ १,५०० कोटी रुपयांची असून पैकी २०१५ पर्यंत १५० कोटी रुपयांचा व्यवसाय होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. एकूण ही बाजारपेठही या कालावधीत दुप्पट होणार असल्याचेही ते म्हणाले. यामध्ये सर्वाधिक हिस्सा हा केस निगा क्षेत्रातील उत्पादनांचा असल्याचेही त्यांनी सांगितले.