येनकेनप्रकारेण उद्दिष्ट गाठण्याचे कर प्रशासनाला फर्मान

नवी दिल्ली : प्रत्यक्ष कर अर्थात प्राप्तिकरांतून आर्थिक वर्ष २०१८-१९ साठी निर्धारित १२ लाख कोटी रुपयांच्या उद्दिष्टाच्या तुलनेत तब्बल १५ टक्के तुटीचा महसूल ही केंद्र सरकारसाठी मोठी डोकेदुखी ठरणार असून, या संबंधाने स्पष्ट नाराजी व्यक्त करीत केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने अपेक्षित उद्दिष्ट गाठण्यासाठी कंबर कसण्याचे कर प्रशासनाला आवाहन केले आहे.

केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने देशभरातील  मुख्य कर आयुक्तांना पत्र लिहून, युद्ध पातळीवर प्राप्तिकर वसुली करण्याचे फर्मान सोडले आहे. मंगळवारी हे पत्र आयुक्तांना रवाना करण्यात आले. याच पत्रात, प्राप्तिकर संकलनाच्या आढाव्याअंती २३ मार्चपर्यंत केवळ १०.२१ लाख कोटी रुपयेच गोळा झाले असल्याचे नमूद करण्यात आले आहे. निर्धारित १२ लाख कोटी रुपयांच्या उद्दिष्टाच्या तुलनेत गोळा झालेला महसूल ८५.१ टक्के असून, आर्थिक वर्ष संपुष्टात यायला आठवडय़ाचा कालावधी शिल्लकराहिला असताना ही स्थिती चिंताजनक असून, तातडीने पावले टाकणे आवश्यक असल्याचे या पत्रातून सूचित करण्यात आले आहे.

गेल्या दोन-तीन वर्षांपासून करदायित्व पूर्ण न करणाऱ्यांविरोधात दंडात्मक कारवाईच्या प्रमाणात वाढ झाली आहे, तरीही त्याचे प्रतिबिंब प्रत्यक्षात कर संकलनात उमटताना न दिसणे आश्चर्यकारक असल्याचे कर प्रशासनातील वरिष्ठ सूत्रांनीही मत व्यक्त केले.

त्याचप्रमाणे करसंकलन हे एकंदर अर्थव्यवस्थेवरही अवलंबून असून, अर्थव्यवस्थेचीच कामगिरी जर अपेक्षेप्रमाणे नसेल तर करवसुलीतही तूट राहणारच असेही त्यांनी सूचित केले.

कर भरणा ३१ मार्चपर्यंतच!

कोणाही व्याक्तिगत करदात्याचे वार्षिक करदायित्व हे १०,००० रुपये अथवा त्यापेक्षा जास्त असेल, तर त्याने आपले हे दायित्व अग्रिम कर भरणा करून पूर्ण करणे कायद्याने बंधनकारक आहे. हा अग्रिम कराचा शेवटचा हप्ता भरण्याची १५ मार्च ही मुदत उलटून गेली आहे. अर्थात आर्थिक वर्ष २०१८-१९ मधील संपूर्ण करदायित्व या तारखेपर्यंत करदात्यांनी पूर्ण करणे अपेक्षित आहे. तरीही कर भरायचे शिल्लक राहिले असेल, तर ३१ मार्च २०१९ पर्यंत विलंबाने व्याजासहित प्राप्तिकर भरता येणार आहे.