३२२ कोटी रुपयांच्या फसवणुकीचे नवीन प्रकरण उघडकीस

पंजाब नॅशनल बँकेतील फसवणूक प्रकरणाचा आकडा वाढणार नाही, अशी सरकारकडून ग्वाही देऊन दिवस होत नाही, तोच देशातील सर्वात मोठा थकीत कर्ज घोटाळा हा १३,००० कोटी रुपयांवर गेला असल्याचे स्पष्ट झाले आहे.

केंद्रीय अन्वेषण विभागाने पीएनबी प्रकरणातील मुख्य सूत्रधार हिरे व्यापारी नीरव मोदीविरोधात गेल्या आठवडय़ात नवीन तक्रार दाखल केली. या तक्रारीत मोदीच्या मालकीच्या दोन कंपन्यांचे नाव घेण्यात आले असून फसवणूक रक्कम ३२२ कोटी रुपये असल्याचे नमूद केले आहे.

पीएनबीतील थकीत कर्ज फसवणूक प्रकरणाचा सुरुवातीचा आकडा ११,४०० कोटी रुपयांचा होता. यानंतर ही रक्कम १२,७०० कोटी रुपये झाली असल्याचे खुद्द बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुनील मेहता यांनी स्पष्ट केले होते. आता ही रक्कम १३,००८ कोटी रुपयांवर गेली आहे.

केंद्रीय अर्थव्यवहार सचिव सुभाष चंद्रा गर्ग यांनी गुरुवारीच पंजाब नॅशनल बँकेतील फसवणूक प्रकरणातील रक्कम वाढणार नाही, असा दावा केला होता. पीएनबी-मोदी प्रकरणात तपास यंत्रणांची कारवाई योग्य दिशेने सुरू असून अधिक काही बाहेर येण्याची शक्यता नाही, असेही गर्ग म्हणाले होते.

केंद्रीय अन्वेषण विभागाने पीएनबी प्रकरणात मोदीविरुद्ध यापूर्वीच दोन तक्रारी दाखल केल्या आहेत. आताच्या तक्रारीत मोदीच्या मालकीच्या फायरस्टार इंटरनॅशनल लिमिटेड व फायरस्टार डायमंड इंटरनॅशनल यांची नावे नमूद करण्यात आली आहेत.

पीएनबीने आधीच २८०० कोटी गमावले

पंजाब नॅशनल बँकेने सरलेल्या २०१६-१७ वित्त वर्षांत २,८०० कोटी रुपये विविध घोटाळ्यांमध्ये गमावल्याचे सरकारने म्हटले आहे. सर्वात मोठय़ा बँक घोटाळ्याप्रमाणेच सर्वात मोठे नुकसान यारूपात पीएनबीने नोंदविले आहे. तर देशातील सर्व बँकांनी मिळून मार्च २०१७ अखेर विविध २,७१८ घोटाळे आणि आर्थिक गैरव्यवहाराच्या प्रकरणात १९,५३३ कोटी रुपये गमावल्याचे केंद्रीय अर्थखात्याने शुक्रवारी संसदेत स्पष्ट केले. रिझव्‍‌र्ह बँकेकडून उपलब्ध माहितीनुसार, २०१२ ते २०१७ या पाच वर्षांत घोटाळ्यांपायी बँकांनी गमावलेल्या रकमेचा आकडा ६१ हजार कोटींच्या घरात जाणारा आहे.