यूबी समूह तसेच किंगफिशर एअरलाइन्स या मृतवत कंपनीचे अध्यक्ष विजय मल्या यांची गुरुवारी बँकांच्या थकलेल्या सुमारे ९०० कोटी रुपयांच्या कर्जप्रकरणी सीबीआय अर्थात केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाकडून चौकशी करण्यात आली.
ही चौकशी प्रामुख्याने किंगफिशर एअरलाइन्ससाठी घेतल्या गेलेल्या व बुडीत खाती गेलेल्या कर्जासंबंधी असल्याचे समजते. गेल्या महिन्यांत तपास यंत्रणेने मल्या यांच्यासह, किंगफिशर एअरलाइन्सचे मुख्य वित्तीय अधिकारी ए. रघुनाथन आणि आयडीबीआय बँकेच्या अधिकाऱ्याविरोधात गुन्ह्य़ाची नोंद केलेली आहे.
किंगफिशरला पतमर्यादेपेक्षा अधिक व नियम डावलून कर्जमंजुरी केली गेली आणि कंपनीकडून कर्जाचा इच्छित कारणासाठी विनियोग न होता तो अन्यत्र वळविला गेला असा त्यांच्यावर आरोप आहे.
या आधी मद्यसम्राट मल्या यांच्या मुंबई, गोवा, बंगळुरू येथील निवासस्थानांची सीबीआयने झडती घेतली आहे.