‘मल्टी कमॉडिटी एक्स्चेंज’ (एमसीएक्स) या देशातील पहिल्या वायदे बाजाराचे संस्थापक जिग्नेश शहाविरोधात तपास यंत्रणांनी नव्याने तक्रारी दाखल केल्या आहेत. शहा यांच्या मालकीच्या मुंबईतील मालमत्तांवरही केंद्रीय अन्वेषण विभागाने शुक्रवारी छापे टाकले.

वायदे बाजाराला दिलेल्या परवानगीच्या तब्बल १५ वर्षे जुन्या प्रकरणात शुक्रवारी झालेली कारवाई आश्चर्यकारक असल्याचा दावा करतानाच एमसीएक्सच्या विद्यमान ६३ मून्स कंपनीने तपास यंत्रणांना शहा यांच्या निवासस्थानी काहीही सापडले नसल्याचा दावा केला आहे.

शहा तसेच त्यांच्या पूर्वाश्रमीच्या एमसीएक्सच्या मालकीच्या मुंबईसह विविध नऊ ठिकाणच्या मालमत्तांवर केंद्रीय अन्वेषण विभागाने छापे टाकले. मात्र या अंतर्गत जप्ती करण्यात आली अथवा नाही, हे कळू शकले नाही. दरम्यान, केंद्रीय अन्वेषण विभागाच्या कंपनीच्या मुख्य प्रवर्तकांवरील शुक्रवारच्या कारवाईने भांडवली बाजारात सूचिबद्ध ६३ मून्सचा समभाग ५ टक्क्यांनी घसरला.

केंद्रीय अन्वेषण विभागाने शहा यांच्याविरुद्ध दाखल केलेल्या नव्या तक्रारीत वायदा बाजार आयोगाच्या माजी चार अध्यक्षांची नावेही आहेत. वायदा बाजाराला मिळालेल्या परवानगी तसेच त्याच्या कारभाराबाबतचे आक्षेप यापूर्वी नोंदविण्यात आले होते. याकरिता शहा यांना काही महिने तुरुंगाआडही जावे लागले होते.