तालबिरा-२ या कोळसा खाणीच्या संदर्भातील गैरव्यवहाराच्या प्रकरणी माजी कोळसा सचिव पी. सी. पारख व उद्योगपती कुमारमंगलम बिर्ला यांच्याविरोधातील खटल्याची प्रक्रिया या आठवडय़ात बंद करण्यात येईल असे सीबीआयने स्पष्ट केले आहे. सीबीआयचे प्रवक्ते कांचन प्रसाद यांनी सांगितले, की या आठवडय़ात या प्रकरणाची फाइल बंद करण्यात येईल. सीबीआयने याबाबत असा निष्कर्ष काढला होता, की तालबिरा २ कोळसा खाण वाटपात पी. सी. पारख व कुमारमंगलम बिर्ला हे दोषी असावेत व त्यांची नावे सोळा महिन्यांच्या प्राथमिक चौकशीनंतर प्राथमिक माहिती अहवालात घेण्यात आली होती. सीबीआयच्या सूत्रांनी सांगितले, की त्यांच्याविरोधात प्राथमिक माहिती अहवालात करण्यात आलेले आरोप सिद्ध करण्यासाठी पुरेसे पुरावे मिळालेले नाहीत, त्यामुळे त्यांची नावे या प्रकरणातून वगळण्यात येतील. १५ ऑक्टोबर २०१३ रोजी या प्रकरणी प्राथमिक माहिती अहवाल दाखल केल्यानंतर पंतप्रधान कार्यालयाने असे स्पष्टीकरण केले होते, की याबाबत घेतलेला अंतिम निर्णय हा गुणवत्तेवर आधारित असून योग्य आहे. सीबीआयने त्यांच्या प्राथमिक माहिती अहवालात पारख व बिर्ला यांच्यावर गुन्हेगारी कट व गुन्हेगारी वर्तनाचा आरोप ठेवला होता. त्यानंतर माजी कोळसा सचिव पारख यांनी त्यांच्या पुस्तकात सीबीआय वेगळाच खेळ खेळत असल्याचा आरोप केला होता. त्यांनी सीबीआयचे संचालक रणजित सिन्हा यांनी आपण व बिर्ला यांचे नाव कट व भ्रष्टाचाराचे आरोप करून माहिती अहवालात समाविष्ट केले व त्याद्वारे त्यांनी पदाचा गैरवापर केला.