मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स समुहाद्वारे फ्युचर समुहाच्या रिटेल, होलसेल, लॉजिस्टिक्स आणि वेअर हाऊसिंग व्यवसायाच्या अधिग्रहणाला कॉम्पिटीशन कमिशन ऑफ इंडियानं (CCI) मंजुरी दिली आहे. २४ हजार ७१३ कोटी रूपयांमध्ये हा व्यवहार करण्यात येणार आहे. हा व्यवहार पूर्ण झाल्यावर रिलायन्स इंडस्ट्रीजच्या वेगानं वाढणाऱ्या रिटेल व्यवसायाला अधिक चालना देण्यासाठी मदत होईल. ऑगस्ट महिन्यात कंपनीनं या व्यवहाराबद्दल माहिती दिली होती.

रिलायन्स रिटेल व्हेन्चर्स लिमिटेड, रिलायन्स रिटेस आणि फॅशन लाईफस्टाईलद्वारे फ्युचर समुहाच्या रिटेल, होलसेल, लॉजिस्टिक्स आणि वेअर हाऊसिंग व्यवसायाच्या अधिग्रहणाला मंजुरी दिली असल्याची माहिती सीसीआयनं शुक्रवारी दिली. एका ठराविक मर्यादेपुढील करार असल्यास त्याला सीसीआयची मंजुरी आवश्यक असते. सीसीआयला दिलेल्या माहितीनुसार यात सात कंपन्यांचा सामावेश आहे. यामध्ये ये फ्युचर एन्टटरप्रायझेज, फ्युचर कंझ्युमर लिमिटेड, फ्युचर लाईफस्टाईल फॅशन लिमिटेड, फ्युचर रिटेल लिमिटेड, फ्युचर मार्केट नेटवर्क्स लिमिटेड, फ्यूचर सप्लाय चेन सोल्यूशन्स लिमिटेड आणि फ्युचरबाझार इंडिया लिमिटेड आणि त्यांच्या सब्सिडरींचा समावेश आहे.

Amazon ने केला होता विरोध

फ्युचर समूहाविरुद्ध दिलेला आंतरराष्ट्रीय लवादाचा निर्णय रास्त असून तो संबंधित यंत्रणेला कळविण्याचा आपल्याला हक्क असल्याचे समर्थन अ‍ॅमेझॉनने दिल्ली उच्च न्यायालयात केलं होतं. रिलायन्स इंडस्ट्रीजशी नव्याने व्यवहार करून, फ्युचर समुहाने आधी केलेल्या कराराचा भंगच केला, अशी भूमिका कंपनीनं मांडली होती. रिलायन्स व फ्युचर समूहादरम्यान ऑगस्टमध्ये झालेला व्यवहार २४,७१३ कोटी रुपयांचा आहे. सिंगापूरस्थित आंतरराष्ट्रीय लवादाने २५ ऑक्टोबरला या व्यवहारालाच स्थगिती दिली होती. अ‍ॅमेझॉनने या व्यवहाराबाबतचे आक्षेप भांडवली बाजार नियामक सेबी, भारतीय स्पर्धा आयोग तसेच भांडवली बाजारांना कळविले होते.