निर्गुतवणुकीतून जमा महसूल ५३,५५८ कोटींवर

मुंबई : केंद्र सरकारने ८० हजार कोटी रुपयांच्या अर्थसंकल्पीय उद्दिष्टाच्या तुलनेत, चालू आर्थिक वर्षांत निर्गुतवणुकीच्या माध्यमातून सरलेल्या सप्ताह अखेपर्यंत ५३,५५८ कोटी रुपयांचा महसूल गोळा केला आहे. गेल्या आठवडय़ात विक्री झालेल्या ‘भारत २२ ईटीएफ’ योजनेतून त्यात १० हजार कोटी रुपयांची भर पडली आहे.

‘भारत २२’ एक्स्चेंज ट्रेडेड फंड (ईटीएफ) गुंतवणुकीसाठी अतिरिक्त प्रस्तावरूपात १४ फेब्रुवारीला खुला झाला. अग्रणी फंड घराणे आयसीआयसीआय प्रुडेंशियलद्वारे व्यवस्थापित या ईटीएफ फंडासाठी एका दिवसांत ४९,५२८ कोटी रुपयांच्या गुंतवणुकीसाठी अर्ज दाखल झाले. प्रारंभिक लक्ष्याच्या तुलनेत १४ पट अधिक भरणा करणारा प्रतिसाद योजनेने मिळविला आणि १.२५ लाखांच्या घरात अर्ज गुंतवणूकदारांकडून आले. यात विदेशी आणि संस्थात्मक गुंतवणूकदारांकडून ३८,००० कोटी रुपये, छोटय़ा व्यक्तिगत गुंतवणूकदारांकडून २,००० कोटी रुपये आले. छोटय़ा गुंतवणूकदारांना गुंतवणुकीसाठी ५ टक्क्यांची सवलत आहे.

देशाच्या अर्थविकासगाथेत भाग घेण्याकरिता गुंतवणूकदारांना ही सुवर्णसंधी असल्याचे योजनेला मिळालेल्या प्रतिसादातून स्पष्ट होते, असे आयसीआयसीआय प्रुडेन्शियल एएमसीचे व्यवस्थापकीय संचालक निमेश शहा यांनी सांगितले. केंद्राने अ‍ॅक्सिस बँकेतील ‘सुटी’अंतर्गत असलेले भागभांडवल गेल्या आठवडय़ात विकून ५,३७९ कोटी रुपये उभारले. अ‍ॅक्सिस बँकेतील ३ टक्केभागभांडवलाची विक्री केली. इंडियन ऑइल कॉर्पोरेशनच्या समभाग पुनर्खरेदी योजनेतून २,६४७ कोटी रुपये सरकारी तिजोरीत आले आहेत. भेल, एनएचपीसी आणि कोचीन शिपयार्ड या कंपन्यांच्या समभाग पुनर्खरेदीतून सरकारने अनुक्रमे ९९२ कोटी, ३९८ कोटी आणि १३७ कोटी रुपये गोळा केले आहेत. यापुढे कोल इंडियाच्या समभाग पुनर्खरेदी योजनेतून आणखी काही लाभ अपेक्षित आहे.