थेट उसापासून इथेनॉलनिर्मितीच्या प्रस्तावालाही मान्यता

नवी दिल्ली : देशातील विशेषत: उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रातील संकटात सापडलेल्या साखर उद्योगाला दिलासा देण्यासाठी बुधवारी केंद्र सरकारने इथेनॉलचे दर वाढवण्याचा निर्णय घेतला. २०१८-१९ च्या हंगामासाठी (डिसेंबर-नोव्हेंबर) मळीपासून बनवलेल्या (क दर्जाच्या) इथेनॉलचे दर प्रति लिटर ४०.८५ रुपयांवरून ४३.७० रुपये करण्यात आले आहेत. याशिवाय, जीएसटी आणि वाहतुकीचा खर्च सरकार उचलणार आहे.

इथेनॉलचे दर तीन रुपयांनी वाढल्यामुळे अंतिमत: शेतकऱ्याला आर्थिक लाभ होईल, असा दावा केंद्रीय पीयूष गोयल यांनी केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या निर्णयाची माहिती गोयल यांनी पत्रकार परिषदेत दिली.

केंद्र सरकारने थेट उसापासून इथेनॉलनिर्मितीच्या प्रस्तावालाही मान्यता दिली. त्यामुळे पहिल्यांदाच इथेनॉल उत्पादकांना उसापासून आणि ब दर्जाच्या मळीपासून इथेनॉल बनवता येणार आहे. या इथेनॉलचेही दर सरकारने जाहीर केले असून प्रति लिटर ४७.४९ रुपयांना उत्पादक इथेनॉल विकू शकतील. इथेनॉलचे दर वाढल्यामुळे साखर कारखानदारांना इथेनॉलनिर्मिती आर्थिकदृष्टय़ा परवडू शकेल. अतिरिक्त आर्थिक उत्पन्न मिळून त्याचा उपयोग शेतकऱ्यांची देणी देण्यासाठी त्यांना करता येऊ शकेल. सध्या शेतकऱ्यांची २२ हजार कोटींची देणी साखर कारखान्यांकडून थकलेली आहेत.

साखरेचे अतिरिक्त उत्पादन झाल्याने साखरचे दर कोसळले आहेत. साखर कारखान्यांना साखर उत्पादन करणे परवडत नाही. केंद्र सरकारच्या निर्णयामुळे साखर कारखानदार साखरेऐवजी थेट इथेनॉलचे उत्पादन घेऊ शकतील. पेट्रोल- डिझेलमध्ये १० टक्क्यांपर्यंत इथेनॉल मिसळण्यास परवानगी आहे. आत्ता मात्र केवळ २ टक्के इथेनॉलच मिसळले जाते. इथेनॉलला भाव मिळाला तर इथेनॉलचे उत्पादन वाढेल आणि इंधनात त्याचा वापर अधिक होईल. त्यामुळे इंधनाची आयात कमी होऊ शकेल. इंधनाचे दर नियंत्रणात येऊ शकतील, असे गोयल यांनी सांगितले.

इंधनाचा राखीव साठा वाढवणार

खनिज तेलाचा ६५ लाख टनाइतका अतिरिक्त साठा करण्याचा निर्णय  सरकारने घेतला. त्यासाठी ओडिशा आणि कर्नाटकमध्ये दोन ठिकाणी साठे केले जाणार आहेत. २००६ मध्ये यूपीए सरकारने २७ दिवसांचा कच्च्या तेलाचा राखीव साठा करण्याचा निर्णय घेतला होता; मात्र त्याची अंमलबजावणी झालेली नव्हती. यापूर्वी आबुधाबीतील तेल कंपनीशी मोदी सरकारने करार केला होता. त्यानुसार ५८ लाख टन कच्च्या तेलाचा राखीव साठा असेल. आता त्यात ६५ लाख टनापर्यंत भर पडेल, अशी माहिती गोयल यांनी दिली.