कोणत्याही भारतीय प्रवासी विमान कंपनीला आंतरराष्ट्रीय उड्डाणे घेण्यासाठी आवश्यक असलेली किमान पाच वर्षे देशांतर्गत व्यावसायिक अनुभवाची अट शिथिल करण्याची तयारी केंद्र सरकारने सुरू केली असून प्रत्यक्षात तसे झाल्यास त्याचा पहिला फायदा या क्षेत्रात नव्यानेच येणाऱ्या टाटा समूहाला होणार आहे.
भारतीय हवाई क्षेत्रात सलग पाच वर्षे देशांतर्गत विमान सेवेच्या अनुभवानंतरच या क्षेत्रातील कोणत्याही कंपनीला विदेशात उड्डाणासाठी परवानगी देण्याची तरतूद सध्या आहे. त्याचबरोबर अशा विमान वाहतूक कंपनीच्या ताफ्यात किमान २० विमाने असणेही बंधनकारक आहे. मात्र या दोन्ही अटी शिथिल करण्याची तयारी केंद्र सरकारने दाखविली आहे.
या खात्याचे केंद्रीय मंत्री अजितसिंह यांनी सर्वप्रथम ही कल्पना मांडली होती. विदेश विमान उड्डाणासाठीच्या या अटी रद्द करण्याची मागणी त्यांनी केली होती. या अटींचा आपण आढावा घेत असल्याचे वक्तव्यही त्यांनी गेल्या आठवडय़ात केले होते. या अटीचा फेरविचार करण्यासाठी आपण केंद्रीय मंत्रिमंडळाकडेही जाणार असल्याचे ते म्हणाले होते.
केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदम्बरम यांनी अमेरिकन दौऱ्यात असा प्रस्ताव आल्यास आपण त्याला निश्चितच पाठिंबा देऊ, असे नमूद केले. याबाबत संबंधित खात्याच्या मंत्र्यांनी केंद्रीय मंत्रिमंडळापुढे तसा प्रस्ताव दिल्यास आपण त्याचे स्वागतच करू, असेही ते म्हणाले.
पुढील वर्षांच्या सार्वत्रिक निवडणुकांपूर्वी विद्यमान संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारच्या मंत्रिमंडळात याबाबतचा निर्णय झाल्यास टाटा समूहातील एअर एशिया आणि टाटा-सिंगापूर एअरलाइन्सला त्याचा फायदा पदार्पणातच होऊ शकेल. उभय कंपन्यांमार्फत अद्याप उड्डाणे सुरू झाली नसली तरी स्थानिकबरोबरच आंतरराष्ट्रीय उड्डाणे नव्या नियमावलींतर्गत टाटा समूहाला घेता येतील.
भारतीय हवाई क्षेत्रातील एकमेव फायद्यातील गोएअरदेखील विदेशांत उड्डाणासाठी उत्सुक आहे. यापूर्वी किंगफिशरची याबाबतची मनीषा अपूर्ण राहिली आहे. २००७ च्या सुमारास अस्तित्वात आलेल्या या कंपनीची स्थानिक उड्डाणेही गेल्या वर्षभरापासून जमिनीवर खिळली आहेत.