केंद्र सरकारने बुधवारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता सहा टक्के वाढवला आहे. आधी तो मूळ वेतनाच्या ११३ टक्के होता; तो आता ११९ टक्के करण्यात आला आहे. केंद्र सरकारच्या ५० लाख कर्मचारी व ५६ लाख निवृत्तिवेतनधारक यांना या निर्णयाचा फायदा होईल.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत केंद्र सरकारी कर्मचारी व निवृत्तिवेतनधारकांना १ जुलै २०१५ पासून वाढीव महागाई भत्त्याची थकबाकी देण्याचा निर्णय घेण्यात आला. भाववाढीमुळे महागाई भत्ता वाढवला आहे.
सहाव्या केंद्रीय वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार संमत केलेल्या सूत्रान्वये ही वाढ केली आहे. चालू आर्थिक वर्षांतील जुलै २०१५ ते फेब्रुवारी २०१६ दरम्यानच्या आठ महिन्यात यामुळे वर्षांला ६,६५५.१४ कोटी (डीए) तर ४,४३६.७६ कोटी रुपये (डीआर) भार सरकारी तिजोरीवर पडणार आहे. महागाई भत्त्यातील वाढ ही १२ महिन्यांच्या म्हणजे १ जुलै २०१४ ते ३० जून २०१५ या काळातील ग्राहक किंमत निर्देशांकाची सरासरी असते.