केंद्र सरकारच्या डिजिटल भारत योजनेला बळकटी म्हणून, देशतील सर्वसामान्यांना विनामूल्य वाय-फाय इंटरनेट सेवा प्रदान करण्याचा संकल्प मुंबईस्थित जॉयस्टर इन्फोमीडिया प्रा. लिमिटेडने सोडला आहे. सध्या मुंबई आणि पुण्यासह चार शहरांत ४३६ केंद्रांद्वारे १.१५ लाख नोंदणीकृत ग्राहक जोडले गेले आहेत.

आगामी सहा-सात महिन्यांत देशाच्या अन्य राज्यांत ३० शहरांमध्ये मोठय़ा संख्येने वाय-फाय केंद्रे सुरू केली जाणार आहेत.

‘जॉयस्पॉट’ या नावाने ही केंद्रे पुढील टप्प्यात नागपूर, औरंगाबाद, अलिबाग, लोणावळा, खोपोली, सातारा, सांगली, लातूर, सोलापूर, नाशिक या महाराष्ट्रातील प्रमुख शहरांत सुरू केली जातील, असे जॉयस्टर इन्फोमीडियाचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक निकुंज कम्पानी यांनी सांगितले. शाळा-कॉलेजचे आवार, शॉपिंग मॉल, बाजारपेठा, उपाहारगृहे, उद्यान अशा सार्वजनिक व वर्दळीच्या ठिकाणी ही केंद्रे स्थापित केली जातील. स्मार्टफोनधारक सर्वसामान्यांना एक वेळ नोंदणी करून संपूर्ण मोफत २ मेगाबाइट प्रति सेकंद अशा वेगवान इंटरनेट सुविधेचा आनंद उपभोगता येईल, असे कम्पानी यांनी स्पष्ट केले. नोकरी, शिक्षण, महिला सक्षमीकरण असे इंटरनेट वापराचे अनेकांगी फायदे आहेत. सध्याची ३ जी आणि ४ जी इंटरनेट सुविधा महागडी म्हणून त्यापासून वंचित राहिलेल्या लोकांसाठी ‘जॉयस्पॉट’ अत्यंत उपयुक्त ठरतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.