मुंबई : भारत-चीन सीमासंघर्षांचे पडसाद बुधवारी भांडवली बाजारावरही पडले. सत्रात कमालीची तेजी व घसरण नोंदविल्यानंतर मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स दिवसअखेर मात्र शतकी निर्देशांक आपटीने स्थिरावला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराच्या प्रमुख निर्देशांकाने त्याचा ९,९०० चा स्तरही सोडला.

मंगळवारच्या तुलनेत मुंबई निर्देशांक ९७.३० अंश घसरणीसह ३३,५०७.९२ वर बंद झाला. तर निफ्टी ३२.८५ अंश घसरणीसह ९,८८१.१५ पर्यंत स्थिरावला.

करोनाधास्तीची जागा आंतरराट्रीय सीमावाद आणि युद्धजन्य स्थितीने गुंतवणूकदारांच्या मनात घेतली. परिणामी दोन्ही निर्देशांक ०.३० टक्क्यापर्यंत घसरले.

सेन्सेक्समध्ये कोटक महिंद्र बँके चे मूल्य सर्वाधिक फरकाने खाली आले. त्यात जवळपास ३ टक्क्यांपर्यंतची घसरण नोंदली गेली.

तसेच आयटीसी, महिंद्र अँड महिंद्र, पॉवरग्रिड, एचडीएफसी लिमिटेड, एशियन पेंट्स, एनटीपीसीही खाली आले. तर मारुती सुझुकी ४ टक्क्यांनी वाढला. त्याचबरोबर भारती एअरटेल, अ‍ॅक्सिस बँक, इंडसइंड बँक, बजाज फायनान्सही तेजीच्या यादीत राहिले. क्षेत्रीय निर्देशांकांमध्ये ऊर्जा, बहुपयोगी वस्तू, पोलाद, वित्त, बँक, भांडवली वस्तू एक टक्क्यापर्यंत घसरले. तर दूरसंचार, वाहन, माहिती तंत्रज्ञान, ग्राहकोपयोगी वस्तू, स्थावर मालमत्ता निर्देशांक जवळपास पाऊण टक्क्यापर्यंत वाढले.

मुंबई शेअर बाजारातील मिड कॅप व स्मॉल कॅप ०.७१ क्क्यापर्यंत वाढले.