पाव की अर्धा टक्का?

यापूर्वीच्या पतधोरणात दिलेल्या आश्वासनाची पूर्ती रिझव्‍‌र्ह बँकेचे गव्हर्नर करतील, अशी अपेक्षा आहे. तेव्हा यंदा केवळ पाव टक्का की अर्धा टक्का व्याजदर कपात होईल, याबाबतच शंका आहे.
मध्यवर्ती बँकेचे चालू आर्थिक वर्षांतील पहिले पतधोरण मंगळवार, ५ एप्रिल रोजी जाहीर होत आहे.
रिझव्‍‌र्ह बँकेचे गव्हर्नर डॉ. रघुराम राजन यांनी अर्थसंकल्पाची दिशा बघून व्याजदर कपातीबाबत निर्णय घेऊ, असे स्पष्ट करत फेब्रुवारीतील पतधोरण स्थिर व्याजदराचे ठेवले होते. अर्थसंकल्पात सातव्या वेतन आयोगाची अंमलबजावणी व वित्तीय तुटीचे लक्ष्य (सकल राष्ट्रीय उत्पादनाच्या ३.९ टक्के) स्पष्ट झाल्यानंतर आता रिझव्‍‌र्ह बँकेच्या व्याजदर कपातीच्या निर्णयाची साऱ्यांनाच अपेक्षा आहे.
काही दिवसांपूर्वीच ‘मलाही तेच वाटते जे तुम्हा सर्वाना वाटते’ अशी सूचक इच्छा प्रदर्शित करणाऱ्या केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी पतधोरण पूर्वदिनी ‘अधिक व्याजदर हे अर्थव्यवस्थेसाठी मारक आहेत’ असे नमूद केले.
व्याजदर कपात टाळण्यासाठी रिझव्‍‌र्ह बँकेने निमित्त असलेल्या महागाईचा दरही आता स्थिरावला असून तो मार्च २०१६ अखेपर्यंतच्या ६ टक्के लक्ष्यापेक्षा कमी, फेब्रुवारीत ५.१८ टक्के राहिला आहे. तर सावरत असलेल्या विकासाला अधिक चालना देण्यासाठी व्याजदर कपातीचा यंदाचा फेरा उपयोगी ठरू शकतो, अशी आशा उद्योग वर्तुळातून व्यक्त होत आहे.
अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर तीन आठवडय़ातच केंद्र सरकारने पोस्टातील योजनांसह अन्य योजनांवरील बचतीवरील व्याजदर कमी केले. केंद्र सरकारच्या अल्प बचत योजनांच्या व्याज दरात मोठी कपात केल्याने रिझव्‍‌र्ह बँकेला रेपो दरात कपात करण्यास मार्ग मोकळा केला असल्याचे मानले जात आहे.
‘अमेरिकेत महागाईचा दर जरी अपेक्षेनुसार वाढत असला तरी गर कृषी रोजगारात अपेक्षेहून कमी सुधारणा होत असल्याने फेडने भविष्यातील व्याज दर वाढ लांबणीवर टाकल्याचे जाहीर केले आहे. फेडच्या निर्णयाचा विचार रिझव्‍‌र्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन राजन आजच्या पत धोरणात नक्कीच करतील. फेडच्या या भूमिकेमुळे राजन हे रेपो दारात पाव टक्का दर कपात करण्याची शक्यता आहे, ’ असे एलआयसी नोमुरा म्युच्युअल फंडाच्या स्थिर उत्पन्न गुंतवणुकाचे निधी व्यवस्थापक राहुल सिंग यांनी ‘लोकसत्ते’ला सांगितले.

राज्यांच्या वीज वितरण मंडळांचे सक्षमी कारण करणाऱ्या ‘उदय’ योजनेमुळे सरकारच्या कर्ज उचलीत वाढ होण्याच्या शक्यतेमुळे व्याज दरात वाढ झाली होती. परंतु अर्थसंकल्पानंतर सरकारने कर्ज उचल मर्यादेत राखणार असल्याचे जाहीर केल्यामुळे व्याज दर पुन्हा आधीच्या पातळीवर आले आहेत.
– राहुल सिंग, निधी व्यवस्थापक, एलआयसीनोमुरा म्युच्युअल फंड.