अर्थव्यवस्थेतील उतार मान्य करतानाच देशासमोर आव्हाने असल्याची कबुली रिझव्‍‌र्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी सोमवारी दिली. असे असूनही प्रत्येकाने आगामी संधीकडे पाहणे आवश्यक असून परिस्थिती अंधकारमय किंवा मरणासन्न अवस्थेत असल्याचे समर्थन करणे थांबविणे गरजेचे आहे, असे प्रतिपादनही गव्हर्नरांनी केले.

‘फिक्की’ व ‘आयबीए’ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय बँक परिषदेला दास संबोधित करत होते. अर्थव्यवस्थेबाबत माध्यमांमधून होत असलेल्या चित्रणाबाबत दास यांनी या वेळी नाराजी व्यक्त केली. भारतासारख्या अर्थव्यवस्थेपुढे देशांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावरून अनेक आव्हाने आहेत; मात्र येथील अर्थव्यवस्थेबाबत वर्णन होत असलेली परिस्थिती तूर्त नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

गैरबँकिंग वित्त कंपन्यांच्या मालमत्ता गुणवत्तेबाबत आढावा घेण्याची गरज नसून देशातील बँकांप्रमाणेच या क्षेत्राची वित्तपुरवठय़ाबाबतचे कार्य आहे, अशी भूमिका दास यांनी या वेळी मांडली. जवळपास १२,००० गैरबँकिंग वित्त कंपन्यांपैकी ५००हून अधिक अशा वित्त कंपन्यांवर रिझव्‍‌र्ह बँकेमार्फत थेट देखरेख असून तूर्त कोणतीही चिंताजनक स्थिती नसल्याचा दावा दास यांनी या वेळी केला. भांडवल पर्याप्तता, रोख पुरवठा, कार्यप्रणाली याबाबत अशा कंपन्यांची कामगिरी समाधानकारक असल्याचे ते म्हणाले.

वाढत्या थकीत कर्जाचा सामना करणाऱ्या बँकांच्या वित्तपुरवठय़ातील वाढ स्थिर असतानाच व्यापारी बँकांनी त्यांच्या कर्जाचे व्याजदर रिझव्‍‌र्ह बँकेच्या रेपो दराशी समकक्ष ठेवावे, अशी सूचनाही दास यांनी या वेळी केली. याबाबत व्यापारी बँकांनी नवी पद्धती विकसित करण्याची गरजही त्यांनी मांडली.