गेल्या काही महिन्यांत गती पकडत असलेल्या देशाच्या उत्पादन क्षेत्राला सरलेल्या मार्च २०२१ मध्ये पुन्हा उतरती कळा लागल्याचे दिसून आले. करोनाच्या भयंकर वेगाने वाढत्या कहरामुळे उत्पादन क्षेत्र हे सात महिन्यांपूर्वीच्या नीचांकपदाला पुन्हा पोहचले आहे.

‘आयएचएस मार्किट’ने देशाच्या निर्मिती क्षेत्रातील खरेदी व्यवस्थापकांमध्ये केलेल्या सर्वेक्षणाच्या आधारे काढला गेलेला ‘पीएमआय निर्देशांक’ फेब्रुवारीतील ५७.५ अंशांवरून, मार्चमध्ये ५५.४ अंश असा घसरला आहे. निर्देशांकाची ही पातळी मागील सात महिन्यांतील नीचांकी म्हणजे ऑगस्ट-सप्टेंबर २०२० च्या स्तरावर लोळण घेणारी आहे.

पीएमआय निर्देशांकाच्या मोजपट्टीवर ५० हा मध्य असतो आणि ५० पेक्षा जास्त गुणांची नोंद हे विकासदर्शक तर, ५० पेक्षा कमी नोंद ही अधोगती दर्शविणारी असते. त्या मानाने मार्च २०२१ मधील ५५.४ अंशांची नोंद ही उत्पादनात तसेच नवीन कंत्राटामध्ये वाढ दर्शविणारी असली, तरी ते नरमत चालल्याचे दिसून येते, असे आयएचएस मार्किटच्या मुख्य अर्थतज्ज्ञ पॉल्याना डीलिमा म्हणाल्या.

करोनाच्या वाढत्या प्रसाराने यापुढे अर्थव्यवस्थेच्या वाढीला मर्यादा येतील आणि पुन्हा टाळेबंदीसारखे कठोर निर्बंध आल्यास, एप्रिल व नंतरचे महिने खूपच आव्हानात्मक ठरतील, असे सर्वेक्षणात सहभागी व्यवस्थापकांनी संकेत   दिले असल्याचे पॉल्याना यांनी स्पष्ट केले.

नोकऱ्यांवर संक्रात…

टाळेबंदी आणि रोजगारावर मोठ्या प्रमाणात गंडांतर आल्याच्या कटू घटनेला वर्ष उलटत असताना, मार्च २०२१ मध्ये नोकऱ्यांना पुन्हा लक्षणीय गळती लागल्याचे आणि बेरोजगारीच्या समस्येने पुन्हा डोके वर काढल्याचे सर्वेक्षणात दिसून आले. देशभरात दैनंदिन करोना रुग्णवाढीचा आकडा प्रथमच एका लाखांपल्याड गेला आहे. करोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी घरून कामाचे अथवा अनेक प्रकारची कामे पूर्णपणे बंद करण्याचे निर्बंध हे अनेकांच्या रोजगारावर संक्रांत आणणारे ठरेल, असे सर्वेक्षणात सहभागी व्यवस्थापकांनी मत नोंदविले.