छत्तीसगढ राज्य शासनाच्या अंतर्गत कार्यरत असलेल्या छत्तीसगढ पर्यटन मंडळाने भविष्यातील पर्यटन संधीवर नजर ठेवून राज्यातील पर्यटन क्षेत्रात काही महत्त्वपूर्ण योजना आखल्या असून, त्याद्वारे छत्तीसगढला भारतातील सर्वात मोठे ‘इको टुरिझम हब’ बनवण्याची योजना तयारी केली आहे. छत्तीसगढ निसर्गत:  सुंदर असून, येथील पर्यटनात प्राकृतिक सौंदर्याचा अधिक हातभार आहे. राज्यात तीन राष्ट्रीय उद्याने, ११ वन्य जन-जीवन अभयारण्ये आणि जवळपास ३० हून अधिक नसíगक झरे व गुहा आणि मनुष्य नजरेपासून दूर राहिलेली ८० टक्के जैवविविधता आहे.
आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रोत्साहन देण्यासाठी काही महत्त्वाकांक्षी परियोजनांची आखणी छत्तीसगढ पर्यटन मंडळ करत आहे. याअंतर्गत छत्तीसगढ पर्यटन मंडळाला केंद्र सरकारच्या पर्यटन मंत्रालयाकडून या परियोजनेच्या प्राथमिक अंमलबजावणीकरिता ११३.५० कोटी रुपयांचे अनुदान जाहीर केले आहे.
या योजनेअंतर्गत छत्तीसगढच्या सर्वात मोठय़ा जलाराय गंगरेल बंधाऱ्याला सर्वात मोठय़ा पर्यटन स्थळाखाली विकसित करणे, वीरपूर- कोडर- रामपूर- टंडुला या मोठय़ा पर्यटन चमूला प्राकृतिक पर्यटनाच्या दृष्टीने प्रोत्साहित करणे, महत्त्वपूर्ण पर्यटन स्थळांजवळ सभागृह, कॅिम्पग सुविधा आणि पर्यटनाच्या दृष्टीने विशिष्ट श्रेणी विकसित करणे, रस्त्यांच्या उपलब्ध सुविधांचा विकास करणे, सिरपूर आणि छत्तीसगढ येथील सहाव्या शतकातील जगप्रसिद्ध लेणी खजुराहो, भोरमदेव यांसारख्या पुरातत्त्व लेण्यांवर आधुनिक प्रकाश आणि ध्वनिप्रक्षेपणाची व्यवस्था करणे, तसेच ग्रामीण पर्यटनासाठी जत्रा, सण, उत्सव आदींना प्रोत्साहित करणे, आदी योजना ‘इको टुरिझम हब’ अंतर्गत समाविष्ट आहेत, अशी माहिती मंडळाचे संचालक संतोष मिश्रा यांनी दिली.
२०१२ मध्ये राज्याला १५ लाख पर्यटकांनी भेट दिली असून, २०१५ पर्यंत ही संख्या दुप्पट होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.