News Flash

तुटीला आवर, महसूलवाढीचे उपाय

‘आयएमएफ’च्या  गीता गोपीनाथ यांचा अर्थसल्ला

| December 21, 2019 03:44 am

‘आयएमएफ’च्या  गीता गोपीनाथ यांचा अर्थसल्ला

नवी दिल्ली, : आंतरराष्ट्रीय नाणेनिधी अर्थात आयएमएफच्या मुख्य अर्थतज्ज्ञ गीता गोपीनाथ यांनी भारतीय अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने सल्लावजा सूचना देताना, वित्तीय तुटीवर कोणत्याही परिस्थितीत नियंत्रण गरजेचे असल्याचे प्रतिपादन केले. खर्चाला आवर घालण्यासह, महसूलवाढीसाठी वेगवेगळे उपायांचीही आवश्यकता त्यांनी प्रतिपादित केली.

उद्योग संघटना ‘फिक्की’द्वारे आयोजित ९२ व्या वार्षिक परिषदेत बोलताना त्या म्हणाल्या, गेल्या काही तिमाहींपासून खासगी क्षेत्रातून मागणीला घरघर सुरू आहे आणि आता या क्षेत्रातून गुंतवणूकही कमकुवत बनली आहे. खासगी क्षेत्राने गुंतवणुकीचा निर्णय दीर्घावधीसाठी लांबणीवर टाकल्यास त्याचा परिणाम अर्थवृद्धीच्या घसरणीत स्वाभाविकपणे दिसून येईल, असे गोपीनाथ यांनी फिक्कीचे माजी अध्यक्ष हर्ष पती सिंघानिया यांच्याशी झालेल्या वार्तालापात मत व्यक्त केले.

भारतीय अर्थव्यवस्थेसाठी स्थिरता हा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे आणि वित्तीय आघाडीवर शिस्तीतून ही स्थिरत्व येईल. त्यामुळे वित्तीय तुटीबाबत निर्धारीत उद्दिष्टाच्या पालनात हयगय होता कामा नये. महसूल संग्रहणात वाढ आणि खर्चाला आवर घालून हे करावेच लागेल, असे गोपीनाथ यांनी सुचविले.

कर महसूल मंदावला असल्याने, गेल्या आठवडय़ात काही राज्यांनी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना वित्तीय तूट देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पादनाच्या तुलनेत ४ टक्क्य़ांपर्यंत वाढण्यास हरकत नाही, परंतु राज्यांना जीएसटी भरपाईची रक्कम लवकरात लवकर देण्याचा तगादा लावल्याचे दिसून आले. या पार्श्वभूमीवर गोपीनाथ यांनी वित्तीय संयमाचा हा सल्ला दिला असून, अर्थसंकल्पात निर्धारित ३.३ टक्के स्तरापेक्षा वित्तीय तूट वाढणार नाही, याची काळजी घेण्यास सुचविले आहे.

‘फिच’कडून ४.६ टक्के विकासदराचा कयास

नवी दिल्ली : अन्य आघाडीच्या अर्थसंस्थांसह फिच रेटिंग्जनेही चालू २०१९-२० सालासाठी भारतीय अर्थव्यवस्थेच्या वाढीच्या दराचा सुधारित अंदाज खालावून ४.६ टक्के पातळीवर आणला आहे. या संस्थेचा पूर्वअंदाज ५.६ टक्के असा होता. गेल्या काही तिमाहीत सलगपणे सुरू घसरण पाहता अंदाजात संकोच अपरिहार्य ठरल्याचे फिचने म्हटले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 21, 2019 3:44 am

Web Title: chief economist gita gopinath talk on indian economy zws 70
Next Stories
1  ‘ऑरिक’मध्ये गृहनिर्माणासाठी ‘म्हाडा’चे पाऊल
2 बाजार-साप्ताहिकी : अव्याहत तेजी
3 झिपट्रॉन तंत्रज्ञानाच्या शक्तीसह टाटा मोटर्सची ‘नेक्सॉन ईव्ही’
Just Now!
X