News Flash

चिनी भोवरा युआन अवमूल्यनाचा!

चीनने सलग दुसऱ्या दिवशी त्यांचे चलन युआनचे अमेरिकी डॉलरच्या तुलनेत आणखी १.६२ टक्क्यांनी अवमूल्यन करणारे पाऊल टाकले.

| August 13, 2015 06:57 am

चीनने सलग दुसऱ्या दिवशी त्यांचे चलन युआनचे अमेरिकी डॉलरच्या तुलनेत आणखी १.६२ टक्क्यांनी अवमूल्यन करणारे पाऊल टाकले. बुधवारी त्यामुळे युआन प्रति डॉलर ६.३३०६ या दोन दशकांपूर्वीच्या नीचांक स्तरावर आले . पीपल्स बँक ऑफ चायना या चीनच्या मध्यवर्ती बँकेने मंगळवारीही युआनचे २ टक्क्यांनी अवमूल्यन केले होते. रेनमिंबी म्हणूनही ओळखले जाणारे युआन हे चलन आता १९९४ नंतरच्या किमान स्तरावर आहे. चीनने यापूर्वी २००५ मध्येही स्वत:च्या चलनाचे अवमूल्यन करून घेतले आहे. गेल्या सहा वर्षांतील सर्वात कमी विकास दर नोंदविणाऱ्या चीनने निर्यातीला प्रोत्साहन मिळण्यासाठी चलन अवमूल्यनाचे पाऊल उचलले आहे.
चीनच्या चलन दर कपातीमुळे संबंध जगातील भांडवली बाजारांच्या प्रमुख निर्देशांकांमध्ये गेल्या दोन दिवसांपासून मोठी घसरण अनुभवली जात आहे. यामध्ये शांघाय, हाँगकाँग, जकार्ता, सेन्सेक्स, निफ्टी आदी आशियाई भांडवली बाजारांचाही समावेश आहे. त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय वायदे बाजारातही अस्वस्थता निर्माण झाली आहे. चीनकडून युआनचे मूल्य आणखी खाली आणण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

भारतासह विकसित राष्ट्रांकडून धास्ती; ‘आयएमएफ’कडून मात्र पाठराखण
वॉशिंग्टन: डॉलरच्या तुलनेत युआनच्या अवमूल्यनाचे आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने (आयएमएफ) स्वागत केले असून यामुळे मंदीच्या गर्तेत सापडलेल्या चीनला काहीसा दिलासा मिळेल, असे म्हटले आहे. चीनमधील व्यापार, निर्यातीसारखे घटक देशाच्या अर्थव्यवस्थेत महत्त्वाची भूमिका बजावतील, असा आशावादही नाणेनिधीने व्यक्त केला आहे. तथापि चीनमधील या घटनाक्रमाची आंतरराष्ट्रीय संस्थांनी दखल घ्यावी, अशी तक्रारवजा प्रतिक्रिया भारताचे मुख्य आर्थिक सल्लागार अरविंद सुब्रह्मण्यन यांनी व्यक्त केली. भारताने चलन अवमूल्यनाचा गांभीर्याने विचार करावा, असेही त्यांनी सुचविले. चीनच्या चलन अवमूल्यनाच्या धोरणामुळे अमेरिका तसेच युरोपातील अनेक देशांना धडकी भरली आहे. डॉलरच्या तुलनेत चीनने युआनचे मूल्य सलग दोन दिवशी ३.५ टक्क्यांपर्यंत कमी केल्याने विकसित देशांची निर्यात महागडी होणार आहे. दुसरी मोठी जागतिक महासत्ता असलेला चीन गेल्या काही महिन्यांपासूनच्या सकल राष्ट्रीय उत्पादन तसेच निर्यात, व्यापारातील घसरणीचा सामना करत आहे. त्यातच अमेरिका, युरोप ही या देशासाठी महत्त्वाची आंतरराष्ट्रीय बाजारपेठ आहे.

भारतीय निर्यातदारांमध्ये अस्वस्थता
मुंबई : घसरत्या युआनमुळे भारतीय निर्यातदारांमध्ये अस्वस्थता पसरली असून त्याचा फटका भारताची निर्यात तूट विस्तारण्याला बसेल, अशी शंका निर्यातदारांची संघटना असलेल्या ‘फिओ’ने व्यक्त केली आहे, तर युआन स्वस्त झाल्यामुळे चिनी वस्तूंबरोबरच्या स्पर्धेत भारतीय अभियांत्रिकी निर्यात क्षेत्राला टीकाव धरता येणार नाही,  अशी भीती ‘इंजिनीअरिंग एक्स्पोर्ट्स प्रमोशन कौन्सिल’ (ईईपीसी) ने व्यक्त केली आहे. भारतीय अभियांत्रिकी तसेच निर्यात क्षेत्र यापूर्वीच जागतिक मंदीचा सामना करत आहे, असे संघटनेचे अध्यक्ष अनुपम शहा यांनी म्हटले आहे.

विपरीत परिणाम संभवत नसल्याचाही दावा
मुंबई : निर्यातीसाठी चीन ही भारताच्या दृष्टीने मोठी बाजारपेठ नसल्याने घसरत्या युआनचा भारतीय निर्यातीवर लक्षणीय विपरीत परिणाम होणार नाही, असा अंदाज विविध दलाल पेढय़ांनी व्यक्त केला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात तेल व सोन्याचे दर कमी होत असल्याने भारताच्या व्यापार तसेच निर्यात क्षेत्रातील वाढ कायम राहील, असे बीएनपी पारिबासने म्हटले आहे. युआन घसरण रुपयाला पुन्हा एकदा त्याचे वरचे स्तर प्राप्त करून देईल, असे डीबीएसने म्हटले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 13, 2015 6:57 am

Web Title: china devalues yuan
Next Stories
1 सेन्सेक्सची पंधरवडय़ाच्या तळाला लोळण
2 चिनी युआनच्या अवमूल्यनाने बाजारात धडकी
3 अर्थस्थितीत सुधाराचे संकेत
Just Now!
X