चिनी चलन युआनचे अलीकडील तीव्र स्वरूपाचे अवमूल्यन आणि भारतीय रुपयाच्या विनिमय मूल्यातील अस्थिरतेनंतरही उभय देशांना द्विपक्षी व्यापारातील वाढता कल चालू वर्षांतही कायम राहणे अपेक्षित आहे.
केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाशी संलग्न सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भारताने एप्रिल ते जून २०१५ या पहिल्या तिमाहीत २३९.९५ कोटी अमेरिकी डॉलरची निर्यात केली. तर याच कालावधीत भारताची चीनमधून आयात ही १४७०.०५ कोटी रुपयांची राहिली आहे. या तिमाहीत संपूर्ण जगात भारताने केलेली निर्यात ६६४१.४२ कोटी डॉलरची तर भारताची एकूण आयात ९८९५.८ कोटी डॉलरची राहिली आहे.
भारत-चीन व्यापार मैत्री खूप जुनी राहिली असून, त्यात अलीकडच्या काळातील सकारात्मक बदल पाहता २०१५ या संपूर्ण वर्षांत ती ८० अब्ज अमेरिकी डॉलरचे लक्ष्य गाठू शकेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. सरलेल्या २०१४ सालात उभय देशांमधील द्विपक्षीय व्यापाराचे प्रमाण ७०.५९ अब्ज डॉलर इतके होते. २०१३ च्या तुलनेत त्यात ७.९ टक्क्यांची वाढ अनुभवण्यात आली आहे.